मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विदेशातून पोटात लपवून आणलेल्या कोकेन तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनायच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. जॅकलीन माल्टेझ रॉड्स असे या ३६ वर्षीय महिलेचे नाव असून ती मूळची ब्राझिलची रहिवाशी आहे. तिच्या पोटातून ९७० ग्रॅम वजनाचे १२४ कॅप्सूल काढण्यात आले असून या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ९ कोटी ७० लाख रुपये इतकी आहे. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर तिला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जॅकलीन ही ब्राझिल देशाची नागरिक असून ती १९ सप्टेंबरला साऊ पाऊलो येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तिने कोकेनची तस्करी केल्याची कबुली दिली. कोकेन असलेले कॉप्सुल तिने प्राशन केल्याचे उघडकीस येताच तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाच्या आदेशानंतर तिला वैद्यकीय उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथे तिच्या पोटातून डॉक्टरांनी १२४ कॅप्सुल बाहेर काढले होते. या कॅप्सुलमधून डॉक्टरांनी ९७० ग्रॅम वजनाचे कोकेनचा साठा जप्त केला होता. हा साठा नंतर डीआरआयच्या अधिकार्यांकडे सोपविण्यात आला आहे. जप्त केलेले कोकेन सुमारे पावणेदहा कोटीचे आहे. तिला ते कोकेन विदेशात एका व्यक्तीने दिले होते. मुंबई विमानतळाबाहेर तिला ते दुसर्या व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले. त्यासाठी तिला विमानाचे तिकिट आणि कमिशन देण्यात आले होते.
कोकेन तस्करीचा हा प्रकार उघडकीस येताच तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत रविवारी सकाळी तिला अटक करुन किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.