कारवाईची धमकी देऊन वयोवृद्ध बिल्डरची अडीच कोटीची फसवणुक
ड्रग्ज, खंडणी, मनी लॉड्रिगप्रकरणी अटकेची भीती दाखवून गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जून २०२४
मुंबई, – थायलंड येथे पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा तसेच त्यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या विविध बँक खात्यात खंडणीची रक्कम जमा झाल्याचा आरोप करुन मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाईची धमकी देऊन एका वयोवृद्ध बिल्डरची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या बिल्डरच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत असून लोकांनी अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारे कोणीही कारवाईची धमकी देत असल्यास त्याची स्थानिक पोलिसांत तक्रार करावी असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.
६४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार व्यवसायाने बिल्डर असून विलेपार्ले येथे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. पॅरालिसीसच्या ऍटकनंतर त्यांनी निवृत्ती घेतली असून सध्या ते घरी असतात. ४ एप्रिलला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो फेडेएक्स कुरिअर सर्व्हिस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने मुंबईहून थायलंड येथे पार्सल पाठविण्यात आले होते. त्यात काही कपडे, पासपोर्ट, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि ४० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले आहे. ते पार्सल जिथे पाठविण्यात येणार होते, त्याचा पत्ता आणि त्यासाठी १५ हजार ६२५ रुपये फीदेखील भरण्यात आल्याची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी आपण असे कुठलेही पार्सल थायलंडला पाठविले नाही असे सांगितले. मात्र त्याने काहीही न ऐकता त्यांना संबंधित प्रकरण सायबर पोलिसाकडे गेले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला असे सांगून त्यांची लाईन एका व्यक्तीला ट्रान्स्फर केली होती. या व्यक्तीने तो सायबर क्राईममधून रजत पटेल बोलत असल्याचे सांगून त्यांची चौकशी सुरु केली. त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा कोणीतरी गैरवापर केला आहे. त्यामुळे या सर्व बाबी तपासण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे असेही त्याने त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना स्काईपवर बोलण्यास प्रवृत्त केले. या ऍपवर कॉल केल्यानंतर त्यांना मुंबई सायबर क्राईम असे नाव आणि लोगो असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास बसला होता. एकमेकांशी चॅट आणि मोबाईलवर संभाषण करताना त्याने त्यांचा मनी लॉड्रिंगमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची धमकी दिली होती.
याच दरम्यान त्यांना सीबीआय प्रमुख मोहीत मेहरा हे त्यांच्याशी स्काईप आयडीवर संपर्क साधणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने फोन करुन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने विविध बँकेत खाती उघडले असून त्यात खंडणीचे कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा आरोप केला होता. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार तपासणीसाठी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यात त्याने दिलेल्या बँक खात्यात सुमारे अडीच कोटी रुपये ट्रान्स्फर केली होती. या पैशांची चौकशी करुन ती रक्कम त्यांना परत पाठविली जाईल असे सांगण्यात आले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांच्याकडून पैसे जमा झाल्याचे पत्र पाठविण्यात आले होते. चार दिवसांनी त्यांना सर्व आरोपातून मुक्त केल्याचे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र त्यांना सिक्युरिटी मनी म्हणून तीस लाख रुपये भरावे लागतील. ही रक्कम जमा केल्यानंतर त्यांची रक्कम त्यांना पुन्हा पाठविण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तीस लाख रुपये जमा करुन उर्वरित पैसे पाठविण्याची विनंती केली. मात्र ही रक्कम संबंधित व्यक्तीने पाठविली नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना काही प्रतिसाद दिला नाही.
अशा प्रकारे अज्ञात सायबर ठगांनी त्यांनी विदेशात पार्सल पाठविल्याची बतावणी करुन त्यात ड्रग्ज सापडले आहे. त्यांच्या कागदपत्रांवरुन विविध बँकेत खाती उघडण्यात आले असून त्यात खंडणीची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. हा मनी लॉड्रिंगचा गुन्हा असून त्यांच्यावर कारवाईची धमकी देऊन त्यांना विविध बँक खात्यात अडीच कोटी रुपये पाठविण्यास प्रवृत्त केले. या अडीच कोटीचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी १२० बी, ३८४, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ सी, ६६ डी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.