मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन तरुणांना पवई आणि ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी सात लाख साठ हजार रुपयांचा एमडी आणि गांजाचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवई परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, राहुल पाटील, पोलीस हवालदार मारोती सुरनर, लांडगे, खंडागळे, पोलीस शिपाई अर्जुन राठोड, प्रदीप शिरसाट, हनुमंत वारंग यांनी पवईतील पिकनिक हॉटेल जंक्शन परिसरात साध्या वेशात पाठत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे रात्री सव्वादोन वाजता तिथे आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 120 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सहा लाख रुपये आहे.
दुसर्या कारवाईत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. देवी विसर्जनादरम्यान सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना ट्रॉम्बे येथील महाराष्ट्रनगर, प्राथमिक आरोगय केंद्राजवळ काहीजण गांजा विक्रीसाठी आले होते. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बाबशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋता नेमलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील लोंढे, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई कोकरे, एमएसएफ जवान होेंबळे यांनी परिसरात गस्त सुरु केली होती. यावेळी तिथे एका कारमधून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या कारच्या झडतीत पोलिसांना 8 किलो 176 ग्रॅम गांजा सापडला. त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी पवई आणि ट्रॉम्बे पोलिसांनी दोन स्वतंत्र एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांना ते एमडी आणि गांजा कोणी दिला, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आले होते, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.