ड्रग्जच्या गुन्ह्यांत जामिन मिळताच पुन्हा ड्रग्जची तस्करीचा प्रयत्न
एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2026
मुंबई, – ड्रग्जच्या गुन्ह्यांत जामिन मिळताच पुन्हा ड्रग्जची तस्करीच्या प्रयत्नाचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या दोघांकडून पोलिसांनी सुमारे सहा लाखांचे 119 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. रहमतुल्ला जाफर खान आणि अर्शद रज्जाक खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही अंधेरीतील उस्मानिया डेअरीजवळील रहिवाशी असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर त्यांना लोकलक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरी परिसरात काही आरोपींनी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा ठेवला असून या एमडीची लवकरच डिलीव्हरी होणार असल्याची माहिती डी. एन नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, पोलीस निरीक्षक सचिन खोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रेवन्नाथ घुगे, रोहन बंगाळे, पोलीस शिपाई ऋषिकेश बाबर, प्रसाद वरे, सुमित पोळ, अनिकेत वाकोडे यांनी उस्मानिया डेअरीजवळील साईबाबा सोसायटी चाळ, सेवा मंडळ, रुम क्रमांक 31 मध्ये छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी रहमतुल्ला खान आणि अर्शद खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह रुमची तपासणी केल्यानंतर पोलिसांना तिथे 119 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे सहा लाख रुपये आहे. तपासात त्यांना ते ड्रग्ज अरबाज मुझमीन खान ऊर्फ नानू याने विक्रीसाठी दिल्याचे तपासात उघडकीस आले. ड्रग्जसहीत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोन्ही आरोपींना रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात या दोघांविरुद्ध ड्रग्ज तस्करीचे प्रत्येकी एक-एक गुन्ह्यांची नोंद आहे. अलीकडेच ड्रग्जच्या गुन्ह्यांत त्यांना जामिन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच त्यांनी पुन्हा एमडी ड्रग्जचा विक्रीचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या गुन्ह्यांत अरबाज खान ऊर्फ नानू याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.