कोकेन तस्करीप्रकरणी नायजेरीयन नागरिकाला कारावास
बारा वर्षांच्या शिक्षेसह सव्वालाखांच्या दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेला कोकेनच्या तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. होनोरे इग्वे गाही असे या 44 वर्षीय आरोपीचे नाव असून कोकेन तस्करीप्रकरणी त्याला बारा वर्षांचा कारावास व सव्वालाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
थर्टी फर्स्टनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील सर्वच पोलीस ठाणे आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलला वरिष्ठांकडून सतर्क राहण्याचे देण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून 1 जानेवारी 2021 रोजी वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी परिसरात गस्त सुरु केली होती. ही गस्त सुरु असताना रात्री उशिरा सांताक्रुज येथील वाकोला, हंसा भुग्रा रोड, डायमंड आयवा हॉस्टेल परिसरात पोलीस पथकाला एका नॅनो कारमध्ये एक नायजेरीयन नागरिक संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. त्यानंतर त्याला पाठलाग करुन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यात 204 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. या कोकेनची किंमत 51 लाख रुपये आहे. कोकेनसह नॅनो कार असा 52 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तपासात होनोरे हा आफ्रिकन नागरिक असून तो भारतात टुरिस्ट व्हिसावर आला होता. गेल्या काही वर्षांपासून तो वैध कागदपत्राशिवाय भारतात वास्तव्यास होता. नवी मुंबईतील वाशी परिसरात तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची विशेष सेशन कोर्टात नियमित सुनावणी सुरु होती.
अलीकडेच ही सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने त्याला दोषी ठरवून 12 वर्षांच्या कारावासासह सव्वालाख रुपयांच्या दंडाची, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बागम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भोये, पोलीस शिपाई सचिन राठोड यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध विशेष सेशन कोर्टात भक्कम पुरावे गोळा करुन आरोपपपत्र सादर केले होते.