चरस विक्री करणार्या आंतराज्य टोळीचा पर्दाफाश
गुजरातच्या दोन ड्रग्ज तस्करांना दहा कोटीच्या चरससह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – इतर राज्यातून ड्रग्ज आणून मुंबई शहरात विक्री करणार्या एका आंतरराज्य टोळीचा चुन्नाभट्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन ड्रग्ज तस्करांना अटक करुन त्यांच्याकडून पोलिसांनी 10 किलो 53 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. याच चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी आहे. रहिम माजिद शेख आणि नितीन शांतीलाल टंडेल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे गुजरातचे रहिवाशी आहे. त्यांच्याविवरुद्ध एनडपीएस कलमांर्तत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून ड्रग्ज आणून त्याची मुंबई शहरात विक्री करणार्या काही टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. अशा टोळ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या ड्रग्ज तस्करांची माहिती काढत असताना काहीजण कुर्ला परिसरात चरस या ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी कुर्ला परिसरात विशेष मोहीम सुरु केली होती. गस्त घालताना या पथकाला एक तरुण संशयास्पद फिरताना दिसला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे नाव रहिम शेख असल्याचे सांगितले. तो मूळचा गुजरातच्या वलसाड, डुंगरी लिंक रोडचा रहिवाशी आहे. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 1 किलो 907 ग्रॅम वजनाचे चरस सापडले. या चरसची किंमत एक कोटी नव्वद लाख रुपये इतकी किंमत होती.
चौकशीत तो काही दिवसांपूर्वीच गुजरात येथून मुंबईत आला होता. त्याला मुंबई शहरात या चरसची विक्री करायची होती, त्यासाठी तो कुर्ला परिसरात चरसची डिलीव्हरीसाठी आला होता. त्याच्या चौकशीतून त्याचा दुसरा सहकारी नितीन टंडेल याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने वलसाड येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने नितीन टंडेलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 8 किलो 146 ग्रॅम वजनाचे अफगाणी चरस जप्त केले. त्याची किंमत आठ कोटी दहा लाख चाळीस रुपये इतकी होती. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 10 किलो 56 ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले असून त्याची किंमत 10 कोटी 56 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त युसूफ सौदागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस निरीक्षक राजूल ठुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन ढोबळे, पोलीस हवालदार नितेश विचारे, सतीश शेळकंदे, पोलीस शिपाई अमोल सरडे, अमोल यमगर, राऊत, सानप, माळवे यांनी केली.