हेरॉईन विक्री करणार्या सराईत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
तीन महिलांसह नऊजणांना 36 कोटीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 डिसेंबर 2025
मुंबई, – नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह इतर राज्यात हेरॉईनची विक्री करणार्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत तीन महिलांसह नऊ आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे. नवाजीत गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी, समद गालीब खान, अब्दुल कादिर शेख, अब्दुल मुस्कान समरुल शेख, जलाराम नटवर ठक्कर, वसीम मजरुद्दीन सय्यद, रुबीना मोहम्मद सय्यद खान, शबनम खान अशी या नऊजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी 36 कोटी 55 लाख 25 हजार 100 रुपयांचा 8 किलो 832 ग्रॅम वजनाचे हेरॉईन, 8 लाख 26 हजाराची रोख रक्कम, दहा लाखांची एक महागडी कार, 1 लाख 40 हजार 500 रुपयांचे बारा मोबाईल असा 36 कोटी 74 लाख 92 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यापैकी चौघांना कोर्टाने पोलीस तर इतर पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या टोळीचा म्होरक्या पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
16 डिसेंबरला मशिदबंदर परिसरात काहीजण हेरॉईनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पायधुनी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पी डिमेलो रोड, लोहा भवन, प्लॉट क्रमांक 93 च्या गेटजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या जलाराम ठक्कर आणि वसीम सय्यद या दोघांना अटक केली होती. या दोघांकडून पोलिसांनी 326.22 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 30 लाख 48 हजार 800 रुपये इतकी होती. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
पोलीस कोठडीत असताना त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत हेरॉईन विक्री करणारी ही टोळी असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या चौकशीतून रुबीना खान हिला पोलिसांनी अटक केली होती. तिच्या चौकशीत तिला ते हेरॉईन शबनम शेख या महिलेने दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शबनमला राजस्थानच्या अजमेर शहरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी मुस्कान शेख हिला ताब्यात घेतले होते. तिच्या सहकार्यावर अटकेची कारवाई झाल्याचे समजताच ती पळून गेली होती. मात्र तिला मशिदबंदर परिससरातून पोलिसांनी अटक केली. या कटात मुस्कान ही मुख्य आरोपी असल्याने तिला हेरॉईन ड्रग्ज पुरविणार्या आरोपीची माहिती होती. त्यामुळे तिची पोलिसांनी कसून चौकशी केली होती.
यावेळी तिने तिला मेहरबान खान हा हेरॉईन देत होता. त्याच्याकडून हेरॉईन मिळाल्यानंतर ती इतर सहकार्याच्या मदतीने ड्रग्जची विक्री करत होती. याच दरम्यान मेहरबानचा सहकारी तिला हेरॉईनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर बुधवारी 24 डिसेंबरला पोलिसांनी हेरॉईन देण्यासाठी आलेल्या अब्दुल शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 38 लाखांचा हेरॉईनचा साठा जप्त केला. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी मेहरबानच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना या पथकाने अंधेरीतील ओशिवरा, आनंदनगर परिसरात कारवाई करुन एका रुममधून तीन संशयिताना ताब्यात घेतले. त्यात नवाजीत खान, सारिक सलमानी आणि समद खान यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यांत तिघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 33 कोटी 86 लाख 76 हजार 300 रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या हेरॉईनसह आरोपींकडून पोलिसांनी बारा मोबाईल, एक महागडी कार आणि रोख रक्कम आदी मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 8832 ग्रॅम वजनाचे हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. हेरॉईन विक्री करणारी ही सराईत टोळी असून या टोळीचा म्होरक्या मेहरबान पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गावकर, पोलीस निरीक्षक अभिजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम खान, पोलीस उपनिरीक्षक सचिन लहामगे, अनिल वायाळ, पोलीस हवालदार खान, निकम, शेंडे, ठाकूर, पोलीस शिपाई घोडे, वाक्से, पाडवी, अलदर, इतापे, पाटील आणि जगदेव यांनी केली. चालू वर्षांत हेरॉईनचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त होण्याची ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे पायधुनी पोलीस अधिकार्यासह पोलीस कर्मचार्याचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी कौतुक केले होते.