नायट्रावेट टॅबलेट-गांजा तस्करीप्रकरणी दोघांना अटक
गोवंडी व गोरेगाव येथे ऍण्टी नारकोटीक्स सेलची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – नायट्रावेट टॅबलेट आणि गांजा तस्करीचा पर्दाफाश करुन मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नाराकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी गोवंडी व गोरेगाव परिसरातून दोन आरोपींना अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोवंडी आणि गोरेगाव परिसरात काहीजण नायट्रावेट टॅबलेट आणि गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर आणि गोरेगाव युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी घाटकोपर युनिटने एका संशयित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडून पोलिसांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या २१३० नायट्रावेट टॅबलेटचा साठा तसेच सहा लाखांची कॅश असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सुरु असतानाच कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून या अधिकार्यांनी २३ किलो गांजाचा साठा जप्त केला. हा गांजा त्याने इतर शहरातून मुंबईत विक्रीसाठी आला होता, मात्र गांजाची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत पावणेसहा लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांवर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान बेले आणि कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांच्या पथकाने केली.