पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची भीती दाखवून शिक्षिकेची फसवणुक
1 कोटी 72 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे तसेच नरेश गोयलप्रकरणात सहभाग उघडकीस आल्याची भीती दाखवून एका वयोवृद्ध निवृत्त शिक्षिकेची अज्ञात सायबर ठगाने 1 कोटी 72 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. यूट्यूबवर अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार पाहिल्यानंतर तिला तिचीही अशाच प्रकारे फसवणुक झाल्याचे समजले आणि तिने मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्यास सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ऑनलाईन फसवणुकीबाबत मुंबई पोलिसांकडून सतत जनजागृती केली जात असताना सुशिक्षित व्यक्ती अशा सायबर ठगांच्या जाळ्यात सापडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
61 वर्षांच्या शोभा धुमप्पा शेट्टी या माहीम येथे राहत असून त्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. 22 जानेवारीला तिला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो डीएचएल कस्टमर सर्व्हिस या कुरिअर कंपनीतून बोलत असून त्यांचे पार्सल परत जात आहे. या पार्सलमध्ये एमडी ड्रग्जसहीत पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, फॅब्रिक सापडले आहे. त्यात त्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक आहे. तिने ते पार्सल तिचे नसल्याचे सांगितले. यावेळी या व्यक्तीने तिला तिच्या वैयक्तिक माहितीचा कोणीतरी गैरवापर करत असून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. इतकेच नव्हे तर त्याने तिला निखील राज या पोलिसाचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला कॉल करुन ही माहिती सांगितली होती. यावेळी त्याने त्याचे नाव विजय संतोष, सिनिअर इन्वेस्टींग ऑफिसर, क्राईम ब्रॅच असल्याचे सांगितले. नरेश गोयल केसमध्ये त्यांचे नाव आले असून त्यांना या गुन्ह्यांत कुठल्याही क्षणी अटक होईल अशी भीती घातली होती.
काही वेळानंतर त्याने तिला सर्व मदत करण्याचे आश्वासन देत तिला तपासात सहकार्य करण्यास सांगितले. याच दरम्यान तिला वेगवेगळ्या मोबाईल कॉलवरुन व्हाईस आणि व्हिडीओ कॉल आले होते. चौकशी सुरु असताना तिला तिचे लोकेशन कोणाला सांगू नका, गुगल, यूट्यूब आदी सोशल मिडीयाचा वापर करु नका. ती त्यांच्या निगराणीखाली आहे. दर तासांनी तिची चौकशी होईल असे सांगितले. 23 जानेवारीला तिला पुन्हा एका व्यक्तीने कॉल करुन तिच्या बँक खात्यासह प्रॉपटीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रॉपटीसह ब्लॅक मनीची चौकशी होणार असून तिची सुटका व्हावी असे वाटत असल्यास तिने दिलेल्या बँक खात्यात काही पैसे ट्रान्स्फर करावे असे सांगितले.
चौकशी पूर्ण होताच तिला तिचे पैसे परत केले जातील असे सांगितले. त्यासाठी त्याने तिला ईडीच्या नावाने पत्र पाठविले होते. अटकेच्या भीतीपोटी तिने 30 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आरटीजीएसद्वारे पाच वेगवेळ्या बँक खात्यात 1 कोटी 72 लाख 20 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर या व्यक्तीने तिच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आणखीन सत्तर लाख रुपये जमा करण्यास सांगितले. यावेळी तिने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला गावचे घर आणि प्रॉपटी गहाण ठेवून पैसे जमा करण्याचा सल्ला दिला होता.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने गुगलवर अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्याप्रमाणे इतर व्यक्तींना अशाच प्रकारे अज्ञात सायबर ठगांना गंडा घातल्याचे दिसून आले. तो व्हिडीओ तिने संबंधित मोबाईल क्रमांकावर पाठविला असता त्यांनी सॉरी सर्व्हर डिस्कनेक्ट केला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह मध्य सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध कट रचून फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या पाच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.