बॉलीवूडसह राजकरण्यासाठी रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याची कबुली
एमडी ड्रग्जप्रकणी दुबईहून प्रत्यार्पण केलेल्या जबानीतून माहिती उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या राज्यात एमडी ड्रग्ज कारखाने सुरु करुन एमडी ड्रग्जची विक्रीप्रकरणातील एका मुख्य आरोपीस दुबईहून अटक करुन त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. सलमान सलीम शेख ऊर्फ शेरा असे या आरोपीचे नाव असून त्याची सध्या घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्याने बॉलीवूडच्या सेलिब्रिटीसह फॅशन इंडस्ट्रिज तसेच काही राजकरण्यासाठी देश-विदेशात रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. त्यात काही बड्या बॉलीवूड कलाकारासह राजकारण्याचे नावे समोर आली आहे. त्यामुळे या सर्वांची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑगस्ट 2022 रोजी एमडी ड्रग्जप्रकरणी घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी एक कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे 995 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि सव्वालाखांची कॅश जप्त केली होती. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यांत सलमान शेख ऊर्फ शेरा याचे नाव समोर आले होते. चौकशीदरम्यान शेरा हा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या असून तो दुबईत वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली होती. दुबईत राहून तो वेगवेगळ्या राज्यात एमडी ड्रग्ज कारखाने सुरु करुन ड्रग्जची निर्मिती करुन आपल्या सहकार्यांच्या मदतीने विक्री करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजाविली होती. इंटरपोलच्या मदतीने त्याच्या अटक्ेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.
ऑक्टोंबर महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात त्याला दुबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध भारतातील विविध पोलीस ठाण्यात ड्रग्जसंबधित गुन्हे असल्याने त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. दुबईतून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणल्यानंतर त्याला घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तपासात सलमान शेख ऊर्फ शेराने त्याने देश-विदेशात अनेक बॉलीवूड, फॅशन आणि राजकारण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने काही बॉलीवूड कलाकारासह फॅशन इंडस्ट्रिजमधील मॉडेल तसेच राजकारण्यांची नावे सांगितली होती. त्यात दाऊद इब्राहिमचा पुतण्या अलीशाह पारकरसह टोळीशी संबंधित काही गॅगस्ट आदी उपस्थित राहत होते. रेव्ह पार्ट्यांमध्ये सामिल झालेल्या सेलिब्रिटींना त्याने ड्रग्ज पुरविल्याची कबुली दिली आहे. या पार्टीत कोण-कोण सहभागी झाले होते, त्याची एक यादीच पोलिसांकडून बनविण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविली जाणार आहे.
सलमानला त्याच्या भव्य जीवनशैलीसाठी ड्रग्जच्या दुनियेत लविश म्हणून ओळखले जात होते. तो महागड्या गाड्या, घड्याळे आणि कपडे वापरत होता. मार्च 2024 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यांत मुंबई पोलिसांनी एका एमडी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केला होता. याच कारखान्यातून 252 कोटीचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते. चौकशीदरम्यान पहिल्यांदा त्याचे नाव समोर आले होते. त्यापूर्वीच तो विदेशात पळून गेला होता. तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिडिंकेटचा मुख्य आरोपी म्हणून परिचित आहे. हा संपूर्ण व्यवहार तो दुबईतून चालवत होता. रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर तो काही दिवस भूमिगत झाला होत, अखेर त्याला पकडण्यात इंटरपोलला यश आले.
सलमानचा शेख ऊर्फ शेराचा अल्परिचय
सलमान हा डोंगरीचा रहिवाशी असून तो तिथेच ड्रग्जच्या डिलीव्हरीचे काम करत होता. दहा वर्षांपूर्वी त्याला ड्रग्जच्या एका गुन्ह्यांत डोंगरी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचा 47 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला जामिन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. त्यानंतर त्याचा चार वेगवेगळ्या ड्रग्जच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. घाटकोपर युनिटच्या युनिटने 2023 साली काही ड्रग्जसहीत आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी 72 लाख 62 हजाराचा चरस, केटामाईन आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.
2024 रोजी अकोलाच्या बार्शी टाकली पोलिसांनी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारखान्यातून 5548 ग्रॅम वजनाचे इपिड्राईनचा साठा जप्त केला होता. त्याची किंमत 1 कोटी 38 लाख 70 हजार रुपये इतका होता. त्याच वर्षी तेलंगणाच्या बीबीनगर पोलिसांनी अन्य एका एका ड्रग्जचा कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी 23 कोटीचा 110 एमडी ड्रग्ज आणि 10 किलो अल्फ्राझोलमचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अलीकडेच साकिनाका पोलिसांनी म्हैसर येथून एमडी ड्रग्ज बनविणार्या कारखान्यात कारवाईत केली होती. या कारवाईत पोलिसाीं 46 कोटीचा 180 किलो एमडी ड्रग्जसहीत ड्रग्जसाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. या चारही गुन्ह्यांत शेरा याचा सहभाग उघडकीस आला होता.
दुबईत वास्तव्यास असताना त्याने तिथे एमडी ड्रग्ज कारखाने सुरु करुन कारखान्यात तयार होणारा एमडी ड्रग्ज आपल्या सहकार्यांच्या मदतीने विक्री केली होती. या ड्रग्जचा संपूर्ण पैसे त्याला दुबईत पाठविले जात होते. गेल्या तीन वर्षांत त्याने ड्रग्जच्या तस्करीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे त्याला याच चारही गुन्ह्यांत पोलिसांकडून अटक केली जाणार आहे.