मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ डिसेंबर २०२४
मुंबई, – मद्याचे घोट रिचवत स्टेरिंगवर बसून बस चालविणार्या चालकाला वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे अंधेरी पोलिसांनी ताब्यात घेतले. शाळेची पिकनिकसाठी असलेल्या बसवर तो चालक म्हणून काम करत होता. ड्रायव्हिंग धोकादायक वाटल्याने वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार पवार आणि महाले यांनी त्याची चौकशी केली असता तो मद्यप्राशन करुन शाळेची बस चालवत असल्याचे उघडकीस आले. या बसमध्ये ५० विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. कुर्ल्यातील अपघाताची घटना ताजी असताना अंधेरीतील या कारवाईमुळे भविष्यातील होणारी मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जाते.
डिसेंबर महिन्यांत बहुतांश शाळांच्या वतीने वार्षिक सहलीचे आयोजन केले जाते. पालकदेखील आपल्या मुलांना शाळेतील प्रशासनासह शिक्षकांच्या भरोशावर सहलीसाठी पाठवितात. अशीच साकिनाका येथील योगीराज श्रीकृष्ण विद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्यासाठी गोराई येथे एक सहलीचे आयोजन केले होते. त्यासाठी शाळेने गुप्ता ट्रॅव्हेल्सची एक खाजगी बस भाड्याने घेतली होती. मंगळवारी सकाळी ही बस शाळेत आली होती. त्यानंतर ५० विद्यार्थ्यांसह शिक्षकांना घेऊन बसचालक गोराईच्या दिशेने निघाला होता. सकाळी साडेनऊ वाजता ही बस साकिनाक्याहून जात असताना बसचालकाचे ड्रायव्हिंग धोकादायक वाटल्याने तिथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिसांचे अंमलदार पवार आणि महाले यांनी बसचालकाला थांबण्याचा इशारा केला होता.
या चालकाची चौकशी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने मद्यप्राशन केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला मेडीकलसाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा अधिकृत अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नसला तरी त्याने मद्यप्राशन केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर बसचालकाविरुद्ध पोलिसांनी मद्यप्राशन करुन शाळेच्या सहलीची बस चालवून शाळेतील विद्यार्थ्यासह शिक्षकांचा जीव धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे भविष्यातील मोठा अनर्थ टळला आहे. बसचालकाने मद्यप्राशन केल्याचे समजताच शाळेतील शिक्षकासह मुलांच्या पालकांच्या प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे बोलले जाते.