ड्रंक अॅण्ड ड्राईव्हप्रकरणी 211 चालकावर गुन्हे दाखल
13 752 चालकाविरुद्ध 1.31 कोटीची दंडात्मक कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – थर्टी फर्स्ट साजरी करताना मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुनही मुंबईकरांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे दिसून आले. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या 211 जणांवर कारवाई करुन त्यांच्याविरुद्ध ड्रंक अॅण्ड ड्राईव्हप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 13 हजार 752 चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी 1 कोटी 31 लाख 14 हजार 850 रुपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 2025 साली 229 जणांना ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह तसेच 2 हजार 810 जणांवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. शहरात स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
थर्टी फर्स्ट साजरा करताना मुंबईकरांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मुंबईकरांच्या उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अनिल कुंभारे यांनी यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नवीन वर्षांच्या उत्साहाच्या नादात अनेकांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे.
31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात अशा घटना घडून अपघात होत असल्याने संपूर्ण शहरात जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर बार, पब, हॉटेल मालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबरला पोलिसांनी विविध ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. त्याचबरोबर मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या 211 चालकाविरुद्ध ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाईअंतर्गत गुन्हे दाखल करणयात आले.
ही कारवाई ताजी असतानाच 13 हजार 752 चालकाविरुद्ध विना हेल्मेट, सिग्नल जंप करणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सिट, बिना सिट ब्लेट वाहन चालविणे, वेग मर्यादेचे उल्लघंन करणे आदी कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ई चलन कारवाईतंर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही रक्कम 1 कोटी 31 लाख 14 हजार 850 रुपये इतकी आहे.
शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणासह गर्दीचे ठिकाणे, समुद्रकिनारे आणि विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेटवे ऑफ इंडिया, मरिनड्राईव्ह, बँडस्टॅण्ड, जुहू चौपाटी या ठिकाणी तसेच पूर्व नियोजित कार्यकमांच्या ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या होत्या. या दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.