मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – जयपूर-मुंबई विमान प्रवासादरम्यान दम मारो दमचा आणखीन एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजस्थानचा रहिवाशी असलेल्या अर्जुन राम ठालोर या ३४ वर्षांच्या प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भादवीसह एअरक्राफ्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ओम रमेश देशमुख हे घाटकोपरच्या असल्फा, परिसरात राहत असून गेल्या पाच वर्षांपासून एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये असोशिएट सिक्युरिटी अधिकारी म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता जयपूर विमानतळावरुन मुंबईला जाणार्या एका विमान उड्डान केले होते. त्यात अर्जुन ठालोर हा प्रवाशी होता. विमानात सर्व प्रवाशांना दिसले अशा ठिकाणी नो स्मोकिंग चिन्ह लावण्यात आले होते. तसेच जयपूपरहून विमान उड्डान करण्यापूर्वी सिनिअर क्रु काजोल घाग हिने विमानात धुम्रपान करण्यास सक्त मनाई असल्याची घोषणा केली होती. तरीही सव्वासात वाजता अर्जुन हा टॉयलेटमध्ये गेला आणि त्याने स्मोकिंग केले होते. हा प्रकार तिथे कामाला असलेल्या एका महिलेच्या निदर्शनास येताच तिने तिच्या वरिष्ठांना ही माहिती दिली. मुंबई विमानतळावर विमान लँड होताच त्याला विमानतळावरील सुरक्षारक्षकाच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणी भादवीसह एअरक्राफ्ट कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच अर्जुन ठालोरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. चालू वर्षांतील विमान प्रवासांत दम मारो दमची ही तिसरी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी अशाच प्रकारे दोन प्रवाशांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.