६१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची ९२ लाखांची फसवणुक
ड्रग्ज पार्सलसह मनी लॉड्रिंगच्या बहाण्याने गंडा घातला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सेवानिवृत्त झालेल्या एका ६१ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तीन सायबर ठगांनी सुमारे ९२ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. ड्रग्ज पार्सलसह मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेची भीती दाखवून या ठगांनी या महिलेला गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले ओ. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गेल्या काही वर्षांत अशा फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.
६१ वर्षांची तक्रारदार वयोवृद्ध महिला मालाड परिसरात राहत असून ती सध्या एका खाजगी कंपनीत निवृत्त झाली आहे. २९ ऑगस्टला तिला पी. सुमीत नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले. मलेशिया येथे तिच्या नावाने एक पार्सल पाठविण्यात आले होते. या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास दिल्ली पोलिसांकडे असल्याने तिला त्यांच्याकडे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे असे सांगून तिचा कॉल ट्रान्स्फर केला होता. त्यानंतर तिच्याशी पोलीस निरीक्षक असलेल्या एका अधिकार्याने संभाषण केले होते. या अधिकार्याने तिच्यावर मानवीसह ड्रग्ज तस्करीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तिच्या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आले होते, त्यात सतरा प्राप्तकर्त्यांनी पैसे ट्रान्स्फर केले असून ही रक्कम लॉड्रिंगशी संबंधित आहे. याकामी तिला दहा टक्के कमिशन मिळाल्याचे भक्कम पुरावे असल्याचे सांगितले.
यावेळी तिने या संपूर्ण प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगूनही तो अधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने तिला ही केस आमच्याकडून सीबीआयकडे वर्ग झाली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी आता सीबीआयकडून होईल असे सांगून तिचा कॉल अन्य एका व्यक्तीकडे ट्रान्स्फर केला. त्यानंतर तिच्याशी मिलिंद नावाच्या एका व्यक्तीने संभाषण सुरु केले. त्यानेही तिच्यावर मानवी तस्करी, ड्रग्ज तस्करीसह मनी लॉड्रिंगचे आरोप केले. तिच्या बँक खात्याची माहिती काढून तिला तपासाचा भाग म्हणून विविध बँक खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले होते. ही रक्कम आरबीआयच्या लॉकरमध्ये जमा केली जाईल, चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने विविध बँक खात्यात सुमारे ९२ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार तिने तिच्या परिचित लोकांना सांगितल्यानंतर तिला तिची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने उत्तर सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.