एक मंडळ-एक पोलीस अंमलदार योजनेची लवकरच अंमलबजावणी
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिला उपक्रम
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 सप्टेंबर 2025
मुंबई, – राज्यात साजरा होणार्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सणासह उत्सावात सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांमधील संबंध अधिक सक्षम करण्यासाठी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य पोलीस दलाकडून लवकरच एक मंडळ आणि एक पोलीस अंमलदार योजना अंमलात येणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या अभिनव उपक्रमांची सुरुवात करण्याचे आदेश राज्य पोलीस दलाला दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यात वर्षभरात विविध सण-उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. त्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहिहंडी, मोहरम, ईद-ए-मिलाद, शिवजंयती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सणांचा समावेश आहे. या कालावधीत राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, वाहतूक नियंत्रण करणे, आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे आणि सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे पोलिसांकडून संबंधित स्थानिक मंडळाच्या पदाधिकार्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि समन्वय साधून संभाव्य अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात असतो.
त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यात लवकरच एक मंडळ-एक पोलीस अंमलदार ही योजना अंमलात लागू होणार आहे. या योजनेमुळे स्थानिक मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण व थेट संपर्क राखणे, सण-उत्सावात होणार्या अडचणी त्वरीत दूर करणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच सुरक्षिततेची हमी देणे, अनावश्यक गैरसमज, वाद आणि अनुशासनभंग टाळणे, उत्सव यशस्वी, शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी समन्वय बळकट करणे आदी उद्देश असल्याचे सांगण्यात आले. ही योजना यशस्वी करण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी संपूर्ण पोलीस दलाला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील सर्व मंडळाची यादी करण्याचे, उपलब्ध पोलीस अंमलदार-अधिकार्याचीं संख्या लक्षात घेऊन प्रत्येक अंमलदाराला एक किंवादोन मंडळाची जबाबदारी देण्याचे, अंमलदार उपलब्ध नसल्यास एका अंमलीदाराला तीन ते चार मंडळाची जबाबदारी देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा आदेश संबंधित पोलीस ठाण्यामार्फत काढला जाणार आहे. त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची स्वाक्षरी असेल असे नमूद करण्यात आले आहे.
नियुक्त केलेला पोलीस अंमलदार किंवा अधिकारी मंडळाच्या पूर्वतयारी बैठकीत नियुक्त औपचारिक ओळख करुन देईल. त्या अंमलदाराचे कार्य, जबाबदार्या आणि अधिकारी स्पष्ट केले जावे, मंडळातील सर्व पदाधिकारी आणि नियुक्त पोलीस अंमलदारांचा मोबाईल क्रमांक, इतर संपर्क माहिती स्वतजवळ ठेवणे तसेच त्यांचा एक व्हॉटअप ग्रुप बनविला जाणार आहे. जेणेकरुन व्हॉटअप मॅसेजच्या माध्यमातून मंडळाचे पदाधिकारी आणि अंमलदारामध्ये समन्वय राहिला जाणार आहे. उत्सव सुरु होण्यापूर्वी अंमलदाराने मंडळाशी संपर्क साधून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती घेणे, मंडळांना नियमानुसार सर्व अर्ज करुन रितसर परवान्या मिळवून देणे, आगमन मिरवणुक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी, विसर्जन मिरवणुक यांची वेळ, मार्ग, सहभागी लोकांची संख्या वरिष्ठांना कळविणे बंधनकारक असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत मिरवणुकीची पारंपारीक मार्ग बदलणार नाही याची खात्री संबंधित अंमलदाराला घ्यावी लागणार आहे.
मंडळांना ध्वनी प्रदुषणाबाबत जागृत करणे, आक्षेपार्ह देखावे, गाणी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची अंमलदारावर राहणार आहे. वाहतूक पोलीस, बीट अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय साधणे, मंडळाला येणार्या परवानगीशिवाय किंवा इतर अडचणी तात्काळ वरिष्इ पोलीस अधिकार्याना निदर्शनास आणून देण्याची जबाबदारीही संबंधित अंमलदारावर राहणार आहे. मंडळाच्या संपर्कात राहून तातडीच्या प्रसंगी प्रतिसाद देणे, व्हॉटअप ग्रुपच्या माध्यमातून सतत माहिती शेअर करावी. नेमून दिलेलया मंडळांना दररोज किमान एकदा तरी भेट देऊन सर्व पदाधिकार्यांशी चर्चा करावी, मिरवणुकीत सामिल होताना, मिरवणुक सुरु असताना तसेच संपलनंतर मंडळ परत आपल्या भागात पोहचेपर्यत अंमलदार त्यांच्यासोबत राहतील याची जबाबदारी नियुक्त अंमलदारावर असणार आहे.
प्रत्येक उत्सव संपल्यानंतर अंमलदाराने त्याचा एक अहवाल वरिष्ठांना सादर करावा. अहवालात अंमलबजावणीतील यश, आलेल्या अडचणी आणि भविष्यातील सुधारणा यांचा समावेश असावा अशी सर्वच जबाबदारी अंमलदाराची असणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी नियुक्त केलेल्या अंमलदारांची नियमित बैठका घेऊन प्रगतीचा अहवाल घ्यावा. उत्कृष्ट काम करणार्या पोलीस अंमलदारांचा गौरव करुन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करावा. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांमध्ये सण-उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षिततेत पार पडल्याचा आंनद राहिल. नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास वाढेल, संभाव्य वाद, वाहतूक अडचणी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार आहे.