एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडविण्याची धमकी
गोरेगाव-जेजे मार्ग पोलिसात तक्रार; आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे धमकी दिली आहे. धमकी देणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गोरेगाव आणि जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्याच्या सुरक्षेत कपात केली होती, त्यानंतर एकनाथ शिंदे यांना धमकी आल्याने त्याची गृहविभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. गुरुवारी सकाळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून एक मेल प्राप्त झाला होता. त्यात त्यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हा मेल काही पोलीस ठाण्यांना प्राप्त होताच गोरेगाव आणि जे. जे मार्ग पोलिसांनी मेल पाठवून धमकी देणार्या व्यक्तीविरुद्ध विविध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या धमकीची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांना संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मेल पाठविणार्या अज्ञात व्यक्तीचा आयपी अड्रेस ट्रॅक केला जात आहे. तो मेल कोणी आणि कोठून पाठविला याचाही तपास सुरु असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले. या व्यक्तीने मंत्रालयासह गोरेगाव आणि जे. जे मार्ग पोलिसांना मेल करुन ही धमकी दिली होती. या धमकीचा मेल नंतर वरिष्ठांना पाठविण्यात आला होता. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली होती, मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगण्यास नकार देत तपास सुरु असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी ठाण्यातील एका तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
श्रीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासात तो तरुण ठाण्यातील वरळीपाड्याचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले आहे. याच तरुणाने आक्षेपार्ह मजकूर अपलोड करताना एकनाथ शिंदे यांना जिवे मारणची धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेतल्याचे बोलले जाते.