मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मी मंगेश वायल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्ब लावून उडवून देणार आहे, महाराष्ट्र सरकार माझे काहीही वाकड करु शकत नाही असा धमकीचा ईमेल पाठवून एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणार्या दोन आरोपींना बुलढाणा येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मंगेश अच्युतराव वायल आणि अभय गजानन शिंगणे अशी या दोघांची नावे असून या दोघांनीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली होती. बुलढाणा येथून दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले असून त्याचा ताबा गोरेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना धमकीमागे त्यांचा काय उद्देश होता. त्यांना धमकी देण्यास कोणी प्रवृत्त केले होते का, या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.
गुरुवारी सकाळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून एक मेल प्राप्त झाला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. धमकीचा हा मेल गोरेगाव आणि जे. जे मार्ग पोलिसांना प्राप्त झाला होता. धमकीचा हा मेल नंतर वरिष्ठांना पाठविण्यात आला होता. त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रात्री उशिरा गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध 351 (3), 351 (4), 353 (2) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने सुरु केला होता. आरोपीचा शोध सुरु असताना धमकीचा मेल बुलढाणा येथून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक बुलढाणा येथे पाठविण्यात आले होते. या पथकाने अभय शिंगणे आणि मंगेश वायल या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या वाहनांवर बॉम्बे टाकण्याची धमकी दिल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील अभय टेक्निशियन तर मंगेश चालक म्हणून काम करतो. ते दोघेही बुलढाणा येथील देऊळगाव राजा, मही, जिजाऊनगर व बसस्टॅण्डजवळील वॉर्ड क्रमांक चारचे रहिवाशी आहेत. या दोघांनाही नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्यांचा ताबा गोरेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.