मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 नोव्हेंबर 2025
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यातून आपल्या दोन मुलांसोबत पळून गेलेल्या आरोपी महिलेस अवघ्या काही तासांत अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. दिव्या वसंत काळे ऊर्फ मुस्कान पवार असे या 32 वर्षीय महिलेचे नाव असून तिला संभाजीनगर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत तिला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाईल आणि शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी दुजोरा दिला आहे.
दिव्या काळे ही मूळची संभाजीनगरच्या लासून, गंगापूरची रहिवाशी आहे. गुरुवारी ती तिच्या दिड आणि सात महिन्यांच्या दोन मुलांसोबत मुंबईत आला होती. अंधेरी येथे फिरत असताना तिला चोरी करताना स्थानिक रहिवाशांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर तिला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार होते,
मात्र त्यापूर्वीच रात्री उशिरा ती तिच्या दोन्ही मुलांसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यातून पळून गेली होती. हा प्रकार नंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास आला होता, त्यामुळे पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता, मात्र ती कुठेच सापडली नव्हती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांना आरोपी महिलेच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या पथकाने तिच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
एक पथक तिच्या संभाजीनगर येथील गावी गेले होते. यावेळी गावी पळून आलेल्या दिव्या काळे ऊर्फ मुस्कान हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेनंतर तिला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत तिला मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. दिव्या ही रेकॉर्डवरील गुन्हेगार महिला आहे. परिसरात फेरफटका मारताना ती रुममध्ये प्रवेश करुन चोर्या करत होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून ती तिच्या मुलांना तिच्यासोबत ठेवत होती.
अशा प्रकारे चोरी केल्यानंतर ती तिच्या संभाजीनगर येथील गावी पळून जात होती. गुरुवारी ती तिच्या दोन मुलांसोबत चोरीच्या उद्देशाने मुंबईत आली होती. अंधेरी येथे एका रुममध्ये चोरी करताना तिला स्थानिक रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र ती पोलिसांना चकवून पोलीस ठाण्यातून पळून गेली होती. याप्रकरणी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या पथकाने तिला अवघ्या काही तासांत संभाजीनगर येथून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.