जाहिरातीसाठी घेतलेल्या सव्वाकोटीचा अपहार करुन फसवणुक
एव्हरेस्ट कंपनीच्या तक्रारीवरुन व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – भारतासह विदेशात एव्हरेस्ट कंपनीच्या मसाले जाहिरातीसाठी घेतलेल्या सुमारे सव्वाकोटीचा अपहार करुन कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरुन दिल्लीतील व्यावसायिक आणि कनेक्ट कंट्रीचा मालक सुधांशू श्रीवास्तव याच्याविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. सुधांशूने पैशांचा अपहार करुन कंपनीची बदनामी करुन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याचा आरोप कंपनीच्या वतीने तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
तुषार उमेश खराटे हे विक्रोळी परिसरात राहत असून एव्हरेस्ट फु्रड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गेल्या चार वर्षांपासून मिडीया ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एव्हरेस्ट कंपनीच्या मसालेची जाहिरात करण्याची जबाबदारी आहे. काही वर्षापूर्वी त्यांची सुधांशू श्रीवास्तव यांच्याशी ओळख झाली होती. सुधांशू हा व्यावसायिक असून त्याची दिल्लीतील कनेक्ट कंट्री नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचा तो मालक असून त्याची भारतातसह विदेशात जाहिराती देण्याबाबत अनेक कंपन्यांशी ओळख आहे. त्याने त्यांच्या कंपनीच्या जाहिराती इंटरनॅशनल सिनेमा थिअटरमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर सुधांशूच्या कंपनीसोबत सप्टेंबर 2023 रोजी एक करार केला होता. त्यात सुधांशू हा इंटरनॅशनल सिनेमा थिअटरमध्ये त्यांच्या कंपनीच्या मसालेची जाहिरात करणार होता. त्यासाठी त्याला दोन ते तीन कोटी खर्च अपेक्षित होता. या खर्चाचा सर्व तपशील सुधांशूकडून त्यांच्या कंपनीला येणार होते. त्यामोबदल्यात त्याला पाच टक्के कमिशन आणि जीएसटी देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या कंपनीने सुधांशूला 1 कोटी 29 लाख 45 हजार 454 रुपयांचे पेमेंट केले होते. या रक्कमेचे विदेशी कंपन्याकडून इन्व्हाईस डॉलर, पौंड आणि दिराममध्ये देण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कंपनीकडून पेमेंट घेताना सुधांशूने त्यांच्याकडून अतिरिक्त 18 लाख 62 हजार रुपये घेतले होते. असे असताना सुधांशूने जाहिरातीला घेतलेले पेमेंट संबंधित विदेशी कंपन्यांना दिले नव्हते. त्यामुळे या कंपनीकडून त्यांच्या कंपनीकडे सतत विचारणा केली जात होती. याबाबत सुधांशूकडे विचारणा केली असता त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने त्यांच्या कंपनीचे क्रमांक ब्लॉक केले होते, त्यांच्या मेलला उत्तर दिले नाही.
अशा प्रकारे सुधांशूने त्यांच्या कंपनीकडून विदेशात मसालेची जाहिरात करण्यासाठी पैसे घेऊन विदेशी कंपन्यांना पेमेंट न करता त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. तसेच त्यांच्या कंपनीची भारतासह विदेशात बदनामी केली होती. त्यामुळे त्यांच्या कंपनीचे इतर कंपन्यांसोबत संबंध खराब होऊन कंपनीचे आर्थिक नुकसान झाले होते. या प्रकाराने वरिष्ठांच्या आदेशानंतर कंपनीच्या वतीने तुषार खराटे यांनी टिळकनगर पोलिसांत कनेक्ट कंट्रीचे मालक व व्यावसायिक सुंधाशू श्रीवास्तवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.