निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या सूनेची ऑनलाईन फसवणुक

ट्रॅव्हेल्स कंपनीच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – पोलीस सेवेतून पोलीस उपायुक्त म्हणून निवृत्त झालेल्या अंबादास पोटे यांच्या सूनेची 1 लाख 64 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी केनिल ट्रॅव्हेल्सचा मालक अखिलेश सिंग याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विमान तिकिटासह बँकाँकमधील हॉटेलमध्ये राहण्यासाठी आगाऊ पेमेंट करुनही अखिलेश सिंगने विमान तिकिटसह हॉटेलमध्ये बुकींग न करता पैशांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

69 वर्षांचे तक्रारदार अंबादास बबनराव पोटे हे निवृत्त पोलीस उपायुक्त असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील देवीदास लेन, अ‍ॅक्वेरिया क्लबजवळील वासुकमल टॉवर अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा मोठा मुलगा अतुल पोटे याच्या मुलांना सुट्टी असल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांसोबत विदेशात फिरायला जायचे होते. त्यामुळे त्यांची सून चित्रांगदा हिने ऑनलाईन सर्च करुन केनिल ट्रॅव्हेल्सची माहिती काढली होती. यावेळी तिला एक मोबाईल क्रमांक सापडला होता. तिथे संपर्क साधून तिने थायलंड, बँकॉक येथे जाण्यासाठी किती खर्च येईल याबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला चौघांसाठी सात दिवसांसाठी विमान प्रवासासह राहण्याचा खर्च मिळून दोन लाख रुपये सांगण्यात आले होते. त्यासाठी तिला आगाऊ पेमेंट करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने विमान तिकिटासाठी 88 हजार रुपये आणि राहण्यासाठी 1 लाख 12 हजार असे दोन लाख रुपये केनिल ट्रॅव्हेल्सच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर तिला ट्रॅव्हेल्स एजन्सीकडून व्हॉटअपवर बुकींग कन्फर्मेशन झाल्याचे पत्र प्राप्त झाले होते.

17 मेला अंबादास पोटे यांचा मुलगा अतुल, सून चित्रांगदा आणि दोन मुले बँकाँकला गेले होते. तेथील पुलनॅन पटाया हॉटेलमध्ये त्यांनी कन्फर्मेशन लेटर दाखविले असता तिथे त्यांच्या नावाने कुठलेही बुकींग नसल्याचे समजले. त्यामुळे चित्रांगदा हिने केनिल ट्रॅव्हेल्सचा मालक अखिलेश सिंग याच्याकडे विचारणा केला होती. मात्र त्याने टोलवाटोलवी तिला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिने परतीच्या विमान तिकिटाबाबत चौकशी केली असता त्यांचे विमान तिकिटही कॅन्सल झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. विमान तिकिटासह हॉटेलमध्ये राहण्यासाठी आगाऊ पेमेंट करुनही अखिलेश सिंग यांनी त्यांचे तिकिट आणि हॉटेलमध्ये राहण्याचे बुकींग केले नव्हते. तिच्याकडून घेतलेल्या दोनपैकी 1 लाख 64 हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती.

हा प्रकार चित्रांगदा हिच्याकडून समजताच अंबादास पोटे यांनी 1930 सायबल पोर्टल हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. 29 मेला मुंबईत आल्यानंतर अंबादास पोटे यांनी त्यांच्या सूनेसोबत एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अखिलेश सिंग याच्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकणी अंबादास पोटे यांच्या तक्रारीवरुन केनिल ट्रॅव्हेल्सचा मालक अखिलेश सिंग याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने अशाच प्रकारे अन्य काही ऑनलाईन फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page