मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – मुलाविरुद्ध विनयभंगाची बोगस तक्रार करुन मुलासह संपूर्ण कुटुंबियांची सोशल मिडीयावर बदनामीसाठी ब्लॅकमेल करुन एका नामांकित बिल्डरला दहा कोटीच्या खंडणीसाठी धमकावून दिड कोटीचा पहिला हप्ता घेण्यासाठी आलेल्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. हेमलता पाटकर आणि अमरिना जावेरी अशी या दोन्ही महिलांचे नाव असून खंडणीच्या याच गुन्ह्यांत दोघींनाही किल्ला कोर्टाने शनिवार 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्यांचे नावे समोर आली आहेत, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गोरेगाव येथे राहणारे तक्रारदार व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांची बांधकाम क्षेत्रांशी संबंधित एक नामांकित कंपनी असून या कंपनीमार्फत अनेक ठिकाणी प्रोजेक्ट सुरु आहेत. नोव्हेंबर महिन्यांत त्यांच्या मुलाचा साखरपुडा होता. त्यासाठी त्यांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवला होता. याच कार्यक्रमांत त्यांच्या मुलाचे दोन महिलांशी वाद झाला होता. या महिलांनी त्यांच्या मुलानेलेझर लाईटचा वापर करुन त्यांच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा आरोप केला होता. या वादानंतर त्यांच्यात हाणामारीही झाली होती. अखेर ते प्रकरण आंबोली पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी दोन्ही महिलांनी तक्रारदार बिल्डरच्या मुलाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली होती.
याच दरम्यान या दोन्ही महिलांनी त्यांना कॉल करुन त्यांच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यांत अटक करण्यास भाग पाडून त्याच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटु्रंबियांची सोशल मिडीयावर बदनामीची धमकी दिली होती. त्या दोघीही त्यांना सतत ब्लॅकमेल करत होत्या. प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दहा कोटीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील अशीही धमकी दिली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना साडेपाच कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. या प्रकारानंतर त्यांनी गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकार्याची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीची संबंधित अधिकार्याने गंभीर दखल घेत त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविला होता.
त्यांच्या तक्रार अर्जानंतर संबंधित दोन्ही महिलांसह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी कट रचून खोट्या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी देऊन खंडणीसाठी धमकीसह ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी आरोपी महिलांना दिड कोटीचा पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शवून लोअर परेल येथे बोलाविले होते. मंगवारी हेमलता आणि अमरिना या दोघीही खंडणीची रक्कम घेण्यासाठी तिथे आल्या होत्या. यावेळी ही रक्कम घेताना या दोघींनाही पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्यांनी तक्रारदार बिल्डरला ब्लॅकमेल करुन त्यांना खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. अटकेनंतर दोघींनाही बुधवारी सायंकाळी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीत इतर काही आरोपींचे नावे समोर आल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहे. अटक महिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.