वयोवृद्ध शेअरब्रोकरला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने पाच कोटीची धमकी
तक्रारदाराच्या पुतण्यानेच दिली होती खंडणीसाठी धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2026
मुंबई, – मालाड येथे राहणार्या एका वयोवृद्ध शेअरब्रोकरला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने पाच कोटीची खंडणीसाठी धमकी देणार्या एका 40 वर्षांच्या आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. कैलास ओमप्रकाश अग्रवाल असे या आरोपीचे नाव असून तो हरियाणाचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे तो वयोवृद्ध तक्रारदाराचा पुतणा असून त्याने पैशांची गरज असल्याने त्यांना लॉरेन्स बिष्णोईच नावाने पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत विलेपार्ले, बोरिवली, अंधेरीतील काही व्यावसायिकांना लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी आली होती, त्यानंतर मालाड येथे शेअरब्रोकरला आलेल्या धमकीने मुंबईतील व्यापार्यासह व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 62 वर्षांचे तक्रारदार बाबूलाल मदनलाल अग्रवाल हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. शेअर ब्रोकर म्हणून ते परिचित आहेत. 22 फेब्रुवारीला ते त्यांच्या घरी होते. सायंकाळी सात वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप मॅसेज केला होता. या मॅसेजमध्ये त्यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र दोन दिवसांनी म्हणजे 24 फेब्रुवारीला त्यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप मॅसेजद्वारे धमकी दिली होती. या धमकीत या व्यक्तीने त्याच्याकडे पुन्हा पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे तयार ठेवा नाहीतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीचे मॅसेज आणि व्हाईस रेकॉडिंग त्यांनी सेव्ह करुन ठेवले होते. दोन दिवसांत दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यासह त्यांच्या मुलाकडे पाच कोटीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या वयोवृद्ध शेअरब्रोकरने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यांना आलेले मॅसेज आणि व्हाईस रेकॉडिंग दिले होते. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून विदेशी कॉलवरुन मुंबई शहरातील एका व्यावसायिक, व्यापार्यांना खंडणीसाठी धमकी दिली जात आहे. यापूर्वी विलेपार्ले, बोरिवली आणि अंधेरीतील तीन व्यावसायिक आणि व्यापार्यांना लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने खंडणीसाठी धमकी दिली होती.
या धमकीनंतर गुन्हा दाखल होताच विलेपार्ले आणि बोरिवली पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर मालाडच्या शेअरब्रोकरला विदेशातून खंडणीसाठी धमकी आल्याने त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रीत केले होते. आरोपीने अत्यंत हुशारीने त्याची ओळख लपविण्याचा प्रयत्न करताना आधुनिक आयपी अॅड्रेस व्हीपीएन नेटवर्कचा वापर करुन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता.
ते कॉल आणि मॅसेज गुरगाव येथून येत असल्याची माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय गिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय बेडवाल, मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोनाली शिंदे, निलेश बच्छाव, पोलीस हवालदार सातवसे, जाधव, पोलीस शिपाई घाडी आदीचे एक पथक गुरगावला रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तांत्रिक माहितीवरुन कैलास अग्रवाल याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच तक्रारदारांना लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने पाच कोटीची धमकी दिल्याचे उघडकीस आले. कैलास हा हरियाणाच्या गुरुग्राम, साऊथ सिटी, सेक्टर 49, रोजवुड सिटीच्या ई 56/202 मध्ये राहत असून तक्रारदार बाबूलाल अग्रवाल यांचा पुतण्या आहे. त्याचा स्वतचा व्यवसाय होता. त्यात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. ते नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा आधारे घेत त्याच्याच वयोवृद्ध काकांना पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली होती.
अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.