75 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी
खंडणीचा गुन्हा दाखल होताच 66 वर्षांच्या वयोवृद्धाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – चारित्र्यावर गंभीर आरोप केल्याचे सांगून नुकसान भरपाई म्हणून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन आणखीन पाच लाखांच्या खंडणीसाठी एका 77 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच बाळकृष्ण शिवमगपाल जोशी या 66 वर्षांच्या आरोपी वयोवृद्धाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने जुलमाने घेतलेल्या दागिन्यांची विक्री केली असून ते दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.
75 वर्षांची तक्रारदार वयोवृद्ध महिला मालाडच्या सुंदरनगर परिसरात राहते. ती तिच्या घरीच खाजगी ट्यूशन घेते. 24 वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. तेव्हापासून तिच्या घरी चार तरुणी पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती सिनिअर सिटीझन जीवन सौरभ संस्थेमध्ये जात होती. तिथे सर्वच वयोवृद्धांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या संस्थेत तिची बाळकृष्ण जोशीशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघेही संस्थेच्या अनेक कार्यक्रमांत भेटत होते. त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा संस्थेची मिटींग तिच्या घरी होत असल्याने बाळकृष्ण हादेखील तिच्या घरी येत होता.
26 ऑगस्टला तिला बाळकृष्णने कॉल करुन तो तिच्या घरी चहा पिण्यासाठी येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळानंतर तो तिच्या घरी आला होता. काही वेळानंतर त्याने तिला तुम्ही माझ्या चारित्र्यावर गंभीर आरोप केला आहे. तुमच्या आरोपांमुळे समाजात माझी प्रचंड बदनामी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची नुकसानभरपाई द्यावी लागेल असे सांगून तिच्या गळ्यावर चाकू लावून तिच्याकडून सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. जिवाच्या भीतीने तिने त्याला तिच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची एक सोनसाखळी आणि 25 ग्रॅम वजनाचे चार सोन्याच्या बांगड्या असा साडेतीन लाखांचे दागिने दिले होते. त्यानंतर त्याने तिच्याकडे आणखीन पाच लाखांची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या घटनेनंतर ती घरातून बाहेर आली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या इमारतीच्या सुरक्षारक्षकासह इतर सभासदांना सांगितला. त्यानंतर त्यांनी त्याला तिच्या घरातून बाहेर काढले. तसेच पुन्हा सोसायटीमध्ये येऊ नकोस असे सांगितले होते. या घटनेनंतर तिने तिच्या दोन्ही मुलींना हा प्रकार सांगतला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांना घडलेला प्रकार सांगून बाळकृष्ण जोशीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे यांच्याकडे सोपविला होता. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाळकृष्ण जोशीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी बाळकृष्णला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.