वयोवृद्ध वकिलाला खंडणीसाठी धमकी धमकाविणार्या दोघांना अटक
अश्लील फोटो व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – ब्लॅकमेल करुन एका 63 वर्षांच्या वयोवृद्ध वकिलाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना बोरिवली पोलिसांनी अटक केली. समीर अली हनीफ खान ऊर्फ अल्वी ऊर्फ कन्हैन्या आणि भुपेंद्र भगवान सिंह ऊर्फ मुन्ना अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. मसाज करतानाचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची भीती दाखवून या दोघांनी तक्रारदार वकिलांकडून 50 हजाराचा खंडणीचा पहिला हप्ता घेऊन उर्वरित सहा लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे.
यातील 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मूळचे गुजरातच्या भावनगरचे रहिवाशी असून सध्या ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत दहिसर परिसरात राहतात. गेल्या 40 वर्षांपासून ते वकिली व्यवसाय करतात. त्यांना अंगदुखीचा त्रास असल्याने त्यांनी दोन वर्षापूर्वी एका मसाज सेवा देणार्या वेबसाईटवरुन मोबाईल क्रमाक सर्च केला होता. त्यात त्यांना एक मोबाईल क्रमांक सापडला होता. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांना घरी येऊन मसाज सेवा देण्याची ऑफर दिली होती. त्याने स्वतचे नाव समीरअली ऊर्फ कन्हैय्या असल्याचे सांगितले होते. त्यांचा बोरिवली येथे एक फ्लॅट असल्याने त्याने त्याला तिथेच मसाजसाठी बोलाविले होते. मसाजनंतर त्याने समीरअलीला ऑनलाईन सात हजाराचे पेमेंट केले होते.
7 सप्टेंबरला त्यांनी पुन्हा समीरअलीला मसाजसाठी बोलाविले होते, मात्र तो उपलब्ध नसल्याने त्याने त्याचा मित्र मुन्ना याला त्यांच्या फ्लॅटमध्ये पाठविले होते. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांचे सर्व कपडे काढून बेडवर झोपले होते. याच दरम्यान मुन्नाने त्यांचे काही फोटोसह व्हिडीओ काढले होते. मात्र त्यांना ते समजले नाही. काही वेळानंतर तिथे समीरअली आला. या दोघांनी त्यांना त्यांचे मसाज करतानाचे काही अश्लील फोटोसह व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यांनी पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
इतकेच नव्हे तर पैशांसाठी या दोघांनी त्यांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या मोबाईलवरुन गुगल पे या अॅपद्वारे 50 हजार रुपये घेतले होते. उर्वरित सहा लाखांची व्यवस्था करा नाहीतर तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन समाजात त्यांची बदनामीची धमकी दिली होती. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2025 या कालावधीत त्यांनी अनेकदा खंडणीच्या पैशांसाठी जिवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तक्रारदार वकिलांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत समीरअली ऊर्फ कन्हैय्या व मुन्ना या दोघांविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या समीर अली आणि त्याचा सहकारी भुपेंद्र सिंह या दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.