ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकाविणार्या प्रियकराला अटक
प्रेयसीच्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 डिसेंबर 2025
मुंबई, – अश्लील फोटो व्हायरल करुन 40 वर्षांच्या विवाहीत प्रेयसीला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकाविणार्या प्रियकराला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद नदीम रजाक इनामदार असे या आरोपी प्रियकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध त्याच्याच प्रेयसीच्या तक्रारीवरुन ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला ही तिच्या पतीसोबत घाटकोपर येथे राहत असून तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिचे मोहम्मद नदीमसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते. याच प्रेमसंबंधातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्याच्याकडे तिचे काही अश्लील फोटो होते. याच फोटोच्या मदतीने गेल्या काही दिवसांसून तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडे सतत खंडणीची मागणी करत होता. बदनामीच्या भीतीने तिने त्याला वेळोवेळी 45 हजार रुपये दिले होते. तरीही तो तिला खंडणीसाठी धमकावत होता.
तिने पैसे दिले नाहीतर त्यांच्यातील प्रेमसंबंध तिच्या पतीला उघड करण्याची, तिला जिवे मारण्याची तसेच तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यासाठी तो तिच्याकडे आणखीन 45 हजाराची मागणी करत होता. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिच्या पतीला फोन करुन त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने पैसे दिले नाहीतर तिच्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती.
मोहममद नदीमकडून सतत ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली जात असल्याने तक्रारदार महिला प्रचंड मानसिक तणावात होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला होता. त्यानंतर या दोघांनी मोहम्मद नदीमविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी तिने घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार मोहम्मद नदीमविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु असून त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याच मोबाईलमध्ये तक्रारदार महिलेचे काही अश्लील फोटो असल्याचे पोलिसांनी सांगितले.