मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन बदनामीची धमकी देऊन २५ कोटीची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवून निकिता शाम दाधीच ऊर्फ किमया कपूर या महिलेस अटक केली खंडणीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. लैगिंक अत्याचाराची खोटी तक्रार करुन समाजासह सोशल मिडीयावर बदनामीची धमकी देऊन तिने आधी पंधरा लाख रुपये वसुल केले आणि नंतर पंचवीस कोटीच्या खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
५८ वर्षांचे तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून ते अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात. गेल्या वर्षी त्यांची निकिताशी ओळख झाली होती. ती अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहत होती. त्यांची पर्सनल सेक्रेटरी म्हणून तिने त्यांच्याकडे नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याशी जवळीक निर्माण केली होती. या ओळखीनंतर ते दोघेही एकमेकांच्या चांगले परिचित झाले होते. अनेकदा ती आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होती. त्यांनी तिला मदत म्हणून पंधरा लाख रुपये दिले होते. जानेवारी महिन्यांत चहा पिण्याचा बहाणा करुन तिने त्यांना तिच्या घरी बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर चहामधून गुंगीचे औषध देऊन तिने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ बनविले होते.
याच व्हिडीओचा गैरवापर करुन ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. सतत कॉल आणि मॅसेजद्वारे त्यांना धमकी देत २५ कोटीची मागणी करत होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयासह त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना तसेच मित्रांना पाठवून त्यांची बदनामीची धमकी देत होती. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा संपविण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध पोलिसांत खोटी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची धमकी देत होती. तिच्याकडून होणार्या सततच्या ब्लॅकमेलिंगसह खंडणीच्या धमकीला ते प्रचंड कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा सुरु केली होती. त्यात निकिताने त्यांना ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघड होताच त्यांच्या तक्रार अर्जानंतर सोमवारी १९ फेब्रुवारीला आंबोली पोलिसांनी निकिताविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी तिने तिच्या गुन्ह्यांची कबुली दिली होती. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर केल्यांनतर तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. निकिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.