मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अनधिकृत बांधकामावर कारवाईची धमकी देऊन खंडणीसाठी धमकाविणार्या दोन तोतया महानगरपालिकेचे अधिकार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेमकुमार बागवे आणि सतीश दुबे अशी या दोघांची नावे आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी मनपा अधिकारी असल्याची बतावणी करुन इतर काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
राजीव मांगेराम सिंघल हे ६० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा कपड्याचा व्यवसाय आहे. ते भारत चेंबर ट्रस्टचे ट्रस्टी असून ही संस्थेमार्फ गरजू लोकांना मेडीकल उपचारासाठी मदत केली जाते. ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. काळबादेवी परिसरात ट्रस्टचे अधिकृत कार्यालय आहे. गेल्या दिड महिन्यांपासून त्यांच्या कार्यालयाचे किरकोळ बांधकाम सुरु आहे. जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात तिथे दोनजण आले होते. या दोघांनी ते मनपाच्या सी वॉर्डमधील अधिकारी आहेत. त्यांच्या इमारतीमध्ये बांधकाम सुरु आहे, त्यासाठी मनपाची परवानगी घेतली आहे का याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या इमारतीच्या खाजगी जागेवर बांधकाम सुरु असल्याने मनपाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगितले. यावेळी या दोघांनी त्यांनी सुरु केलेले बांधकाम अनधिकृत आहे, त्याची मनपाकडून परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे या बांधकामावर कारवाईची धमकी देत कारवाई होऊ नये म्हणून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र राजीव सिंघल यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ते दोघेही सतत त्यांना कॉल करुन खंडणीसाठी धमकावत होते.
या प्रकारानंतर त्यांनी चंदनवाडीतील सी वॉर्डच्या मनपा कार्यालयात जाऊन सतीश दुबे आणि प्रेमकुमार बागवे या मनपा अधिकार्याविषयी चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान त्यांना अशा नावाचे कोणीही मनपा अधिकारी तिथे काम करत नसल्याचे समजले होते. या प्रकारानंतर राजीव सिंघल यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रेमकुमार बागवे आणि सतीश दुबे नाव सांगणार्या या दोन्ही तोतया मनपा अधिकार्यावर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.