मनपाच्या दुय्यम अभियंताला ५५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी
खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेली सहाजणांची टोळी गजाआड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बोगस शैक्षणिक पदवी सादर करुन महानगरपालिकेची नोकरी मिळविल्याचा आरोप त्यांच्यासह त्यांच्या जिवाला धोका असल्याची बतावणी करुन महानगरपालिकेच्या एका दुय्यम अभियंताला ५५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहाजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. प्रताप आश्विनी चोखांदरे ऊर्फ बबलू, अभयराज हंसराज पटेल, शेखर रमेश सकपाळ, आशिष सुरेंद्र पांडे, संतोष पद्मनाथ पुजारी ऊर्फ राजू नायर आणि रफिक बाबू मुलानी अशी या सहाजणांची नावे आहेत. या सर्वांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
यातील तक्रारदार चेंबूर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता म्हणून काम करतात. जुलै महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो अभिनव चॅरिटेबल ट्रस्ट या खाजगी संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यांनी महानगपालिकेची नोकरी मिळविताना बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रे सादर केली होती. त्यांच्याविरोधात त्याच्याकडे पुरावे आहेत. ही माहिती सोशल मिडीयावर जाहीर करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. त्यांच्याकडे काहीजण दुखावले असून त्यांची कोणत्याही क्षणी हत्या होऊ शकते असे सांगून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण मिटविण्यासाठी या व्यक्तीने त्यांच्याकडे ५५ लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांची बदनामीसह हत्येची धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने त्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रताप चोखांदरे, अभयराज पटेल या दोघांनाही दोन लाख रुपये दिले होते. मात्र ही रक्कम देऊनही ही टोळी त्यांना सतत खंडणीसाठी धमकी देत होती. ३१ लाख रुपये देऊन प्रकरण मिटवून टाका असे सांगत होते. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना नऊ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी खंडणीविरोधी पथक कार्यालयात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध ३०८ (२), (४), (५), ३५१ (३), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या सूचनेनंतर त्यांनी एका व्यक्तीला कॉल करुन तीन लाख रुपये घेण्यासाठी गोरेगाव येथे बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे संबंधित आरोपी गोरेगाव येथील आरे रोड, गणेश चाळीजवळील इराणी बेकरीजवळ आले होते. यावेळी तीन लाखांची खंडणीची रक्कम घेताना या आरोपींना खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सुधीर जाधव, कंद, ब्रीद, सुर्वे, वाझे, चौगुले, प्रॉपटी सेलचे पोली निरीक्षक मंगेश देसाई, काटे, पोलीस उपनिरीक्षक गवळी व अन्य पोलीस पथकाने अटक केली. तपासात या टोळीचा रफिक हा मुख्य आरोपी असून त्याने इतर आरोपींना तक्रारदारांची टिप दिली होती. रफिक हाच तक्रारदारांना फोन करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होूता. त्याने इतर काही शासकीय अधिकार्यांचे प्रकरण बाहेर काढल्याचा दावा करुन तक्रारदारांच्या मनात भीती निर्माण करत होता. या टोळीने अशा प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.