देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याची बतावणी करुन फसवणुक
धोबी व्यावसायिकाला १५ लाखांचा गंडा घालणार्या दुकलीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याची बतावणी करुन एका धोबी व्यावसायिकाची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. सुहास हरिश्चंद्र महाडिक आणि किरण दत्ताजी पाटील अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मल्लेश मल्हारी कल्लुरी हे सातरस्ता, जेकब सर्कलच्या साईबाबा नगरात राहत असून ते धोबी व्यवसाय करतात. याच परिसरात त्यांचा कपडे धुण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी महानगरपालिकेकडून लायसन्स काढले असून प्रत्येक महिन्याला भाडे भरतात. त्यांची जागा एसआरए प्रकल्पामध्ये जाण्याची शक्यता आहे. धोबीघाटचा अध्यक्ष संतोष कनोजिया हा काही बिल्डरच्या संपर्कात असून ती जागा बिल्डरकडे जाईल म्हणून त्यांनी रजिस्टार कार्यालयात तक्रार केली होती. याबाबत त्यांनी स्थानिक समाजसेवक कृष्णानंद गंगाधर नायर ऊर्फ ऐट्टा यांच्याकडेही तक्रार केली होती. याच दरम्यान त्यांची सुहास महाडिकशी ओळख झाली होती. त्याने सागर बंगल्यावर काम करणारा एक व्यक्ती त्याच्या परिचित असून तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए आहे. तोच त्यांच्या सोसायटीचे काम करुन देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला सोसायटीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे व्हॉटअपवर पाठवून दिले होते. यावेळी सुहासने त्यांचे काम करुन देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडे ३५ लाखांची मागणी केली होती.
दुसर्या दिवशी त्याने त्यांना फोन करुन विधानभवन येथे बोलावून घेतले. तिथेच त्याने त्यांची ओळख किरण पाटीलशी करुन दिली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या कामासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी सोसायटीच्या सभासदांनी बोलून कळवतो असे सांगितले होते. १६ मार्चला सुहासला कॉल आल्यानंतर त्यांनी ३५ लाख रुपये देणे शक्य नसून ते दहा ते बारा लाख रुपये देऊ शकतात असे सांगितले. चर्चेअंती त्याने किमान पंधरा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून सुहासने त्यांना ही रक्कम घेऊन मंत्रालयाजवळ बोलाविले होते. त्यामुळे त्यांनी पैशांची जमवाजमव करुन पंधरा लाख रुपये जमा केले होते. १८ मार्चला ते त्यांच्या दोन नातेवाईकांसोबत मंत्रालयाच्या मेन गेटजवळ गेले होते. तिथेच त्यांना सुहास आणि किरण भेटला. त्यांनी त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले आणि दोन तासांत त्यांना जागेचे कागदपत्रे मिळतील असे सांगितले. पैसे घेतल्यानंतर ते दोघेही निघून गेले. दोन तासांनी त्यांनी सुहासला फोन केला, यावेळी त्याने थोडा वेळ थांबा. काम होणार आहे असे सांगितले. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ते दोघेही तिथे आले नाही. नंतर त्यांनी त्यांना गोकुळ रेस्ट्रॉरंट येथे बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर ते दोघेही नव्हते. त्यांनी दोघांनाही कॉल केला. मात्र दोघांचेही मोबाईल बंद होते. त्यामुळे ते तिघेही घरी निघून गेले.
दुसर्या दिवशी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. तिथे त्यांनी किरणविषयी विचारपूस केली. यावेळी तिथे किरण नावाचा कोणीही व्यक्ती कामाला नसून तो पीए म्हणून काम करत नसल्याचे समजले. या घटनेने त्यांना धक्काच बसला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याची बतावणी करुन या दोघांची त्यांची पंधरा लाख रुपयांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार मरिनड्राईव्ह पोलिसांना सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याची बतावणी करुन ही फसवणुक झाली होती. त्यामुळे त्याची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सुहास आणि किरण यांना वेगवेगळ्या परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसंनी अटक केली. तपासात यातील सुहास हा जेकब सर्कल येथे राहत असून फेरीवाला आहे. किरण हा टिटवाळाचा रहिवाशी असून ब्रोकर म्हणून काम करतो. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसंाकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पीए सांगून इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.