मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – हज यात्रेसाठी पॅकेजच्या नावाने बोगस तिकिट देऊन फसवणुक करणार्या एका दुकलीस अटक ओशिवरा पोलिसांनी अटक केली. जाहिद इस्तियाक मलिक आणि अमजद इस्तियाक मलिक अशी या दोघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने हज यात्रेसाठी शहरातील चार ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाकडून पैसे घेऊन त्यांचीही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शाहिदा मकसूद अहमद कुरेशी ही ४६ वर्षांची महिला जोगेश्वरीतील आनंदनगर परिसरात राहते. तिला हज यात्रेसाठी सौदी अरेबिया येथे जायचे होते. त्यामुळे तिच्या मुलीने तिकिट बुकींगसाठी ऑनलाईन सर्च केले असता तिला फ्लाय उमराह इंटरनॅशनल या टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सची माहिती मिळाली होती. त्याचे कार्यालय जोगेश्वरीतील बेहरामबाग, जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये होते. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी ती विमानाच्या तिकिट बुकींगसाठी तिथे गेली होती. यावेळी तिथे उपस्थित अमानने तिला सौदीला जाण्याच्या पंधरा दिवसांच्या पॅकेजसाठी दोन व्यक्तींसाठी दिड लाख रुपये सांगितले होते. त्यात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले होते. त्यामुळे तिने सुमारे दिड लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करुन तिच्यासह तिच्या आईसह वडिलांचे बुकींग केले होते. २२ डिसेंबरला ती तिकिट आणि व्हिसासाठी अमानच्या कार्यालयात गेली होती. यावेळी तिथे जाहिद मलिक हजर होता. त्याने अमान आजारी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. त्याने तिला २६ डिसेंबरपर्यंत तिचे तिकिट आणि व्हिसा मिळेल असे आश्वासन दिले. मात्र २६ डिसेंबरला त्याने व्हिसासह तिकिट दिले नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी ती ट्रॅव्हेल्सच्या कार्यालयात गेली होती. तिथे तिला कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. अमान, जाहिदसह इतरांना कॉल केल्यानंतर ते तिला प्रतिसाद दत नव्हते. पैशांची मागणी करुनही ते तिला पैसे पाठवत नव्हते.
५ जानेवारीला जाहिदने तिला व्हॉटअपवर व्हिसा आणि तिकिट पाठविले होते. या व्हिसासह तिकिटाची शहानिशा केल्यानंतर त्याने दिलेले विमान तिकिट बोगस होते. त्यामुळे शाहिदाचा मुलगा फैसल हा त्यांच्या घरी पैशांविषयी विचारणा करण्यासाठी गेला होता. यावेळी जाहिद आणि अमजदने त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याने त्यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध ३२३, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. चौकशीदरम्यान या आरोपींनी तिच्यासह चार टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाकडून हज यात्रेच्या नावाने तिकिटासाठी पैसे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे समजले होते. त्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमान, जाहिद, अमजद आणि शाहिद मलिक या चौघांविरुद्ध ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच चारही आरोपी पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वी जाहिद आणि अमजद मलिक या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.