रेल्वे टेंडरसाठी बोगस बँक गॅरंटी देणार्या चौकडीला अटक
टेंडरसाठी 4 कोटी 32 लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – बंगलोर येथील रेल्वे विभागाकडून मिळालेल्या क्रॉस लाईन टेंडर 38 कोटी रुपयांचे बँक गॅरंटी देण्याची बतावणी करुन बोगस बॅक गॅरंटी देऊन डीआरएन इन्फ्रास्ट्रक्टचर कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी एका चौकडीला चारकोप पोलिसांनी अटक केली. आशिषकुमार हरिश्चंद्र सिंग, हरिचंद्र विष्णूदत्त तिवारी, हेमंत हरिश जोशी आणि सॅम डिसोजा अशी या चौघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत चारही आरोपी पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत जय दोशी, ब्रिजेश भुट्टा यांच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींनी रेल्वे टेंडरसाठी घेतलेल्या 4 कोटी 32 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
नितीन यळवंत देसाई हे शिवडी परिसरात राहत असून सध्या डीआरएन इन्फ्रास्ट्रक्टचर कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काय्ररत आहेत. त्यांची कंपनी अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चांडक चेंबर्समध्ये आहे. ही कंपनीत रोडवर्क, धरण, कॅनल बनविणे आदी काम करते. त्यांच्या कंपनीला महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह रेल्वे विभागाकडून नियमित काम मिळतात. या दोन्ही विभागाचे अनेक प्रकल्प कंपनीने पूर्ण केले आहेत. त्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून कंपनीला शासकीय कंत्राटे घेऊन प्रकल्प पूर्ण करण्याचा अनुभव आहे. या कंपनीचे एका खाजगी बँकेत खाते असून या खात्याचे बीजी लिमिट संपले होते. त्यातच त्यांना बंगलोर येथे रेल्वे विभागाचे क्रॉस लाईनसंदर्भात एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी त्यांना 34 कोटीच्या बँक गॅरंटीची गरज होती. त्यामुळे कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार होते.
याच दरम्यान कंपनीचे सल्लागार सुरेश एच यांना जय दोशी हा बँक गॅरंटीचे काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी जय दोशीशी संपर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. याच संदर्भात त्यांची कांदिवलीतील चारकोप परिसरातील एका हॉटेलमध्ये सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी जय दोशीने त्यांच्या कंपनीला 38 कोटीची बँक गॅरंटी देण्याचे आश्वासन देत त्यासाठी साडेचार कोटीची कमिशनची मागणी केली होती. ही बँक गॅरंटी त्यांना त्यांचा सहकारी ब्रिजेश भुट्टा हा पुण्यातील एका बँकेची काढून देईल असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे कंपनीने जय दोशीला जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत टप्याटप्याने 4 कोटी 32 लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर या दोघांनी त्यांच्या कंपनीला रेल्वेच्या टेंडरसाठी 38 कोटीची बँक गॅरंटी देतो असे सांगून मिरारोड आणि पुण्यातील दोन वेगवेगळ्या बँकेेचे 23 कोटी 66 लाख 63 हजार 041 आणि 14 कोटी 95 लाख 07 830 रुपयांचे दोन बँक गॅरंटीचे दस्तावेज दिले होते. त्यात संबंधित बँक मॅनेजरच्या स्वाक्षरीसह शिक्के होते.
मात्र ते दोन्ही बँक गॅरंटी पाहिल्यानंतर कंपनीचे सल्लागार सुरेश एच आणि कर्मचारी हरिश पै यांना संशय निर्माण झाला होता. याबाबत त्यांनी जय दोशी व ब्रिजेश भुट्टा यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी या दोघांनी त्यांनी अशाच प्रकारे बँक गॅरंटी इतर नामांकित कंपन्यांना दिले आहेत. या कंपन्यांना विविध शासकीय कंत्राटे मिळाली आहे. त्यामुळे तुम्हीही संबंधित बँक गॅरंटी रेल्वे विभागात जमा करा, काहीही अडचण येणार नाही असे सांगितले. मात्र त्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी पुण्यासह मिरारोडच्या संबंधित बँकेत जाऊन संबंधित बँक गॅरंटी दाखवून त्याची शहानिशा केली होती. यावेळी दोन्ही बँकेच्या मॅनेजरने त्यांच्या कंपनीला कुठलीही बँक गॅरंटी दिली नसल्याचे सांगून त्यांच्याकडील असलेले दोन्ही बँक गॅरंटी बोगस असल्याचे सांगितले होते.
अशा प्रकारे जय दोशी, ब्रिजेश भुट्टोसह इतर आरोपींनी बोगस बँक गॅरंटी देऊन कंपनीसह शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नंतर त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना सांगितला होता. त्यानंतर कंपनीच्या वतीने नितीन देसाई यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध 25 ऑगस्टला पोलिसांनी 61, 340 (2), 338, 336 (3), 318 (4), 316 (5), 316 (2) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच या कटात सहभागी असलेल्या आशिषकुमार सिंग, हरिचंद्र तिवारी, हेमंत जोशी आणि सॅम डिसोजा या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. यातील हरिश्चंद्र हा उत्तरप्रदेशच्या सितुरगड, हेमंत मालाड, आशिषकुमार मुलुंड तर सॅम हा वांद्रे परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.