बोगस बँक गॅरटीच्या माध्यमातून खाजगी कंपनीची आर्थिक फसवणुक

८.८१ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी संचालकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – बोगस बँक गॅरटीच्या माध्यमातून हरियाणातील एका नामांकित कंपनीची ८ कोटी ८१ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन कंपन्यांच्या चार संचालकासह एका बँकेच्या उपवस्थापक अशा पाचजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मित हरिश शहा, हरिश शहा, सेजल निमिश मेहता, निमिश मेहता आणि जयेश आगरे अशी या पाचजणांची नावे असून यातील मेहता आणि शहा हे कंपनीचे संचालक तर जयेश आगरे हा एका खाजगी बँकेचा उपव्यवस्थापक असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या चारही संचालकासह बँकेच्या उपव्यवस्थापकाची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार अपूर्वकुमार गर्ग हे मूळचे हरियाणाचे रहिवाशी आहेत. ते सध्या हरियाणाच्या गुरगाव परिसरातील एका नामांकित खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांच्या कंपनीचे अंधेरीतील गावदेवी, मकवाना रोड, वान सेंटरमध्ये एक कार्यालय आहे. गेल्या वर्षी त्यांची मित शहा आणि हरिश शहा यांच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही मूळचे नागपूरचे रहिवाशी असून तिथे त्यांच्या मालकीची मार्शल भावजी ऍण्ड कंपनी आहे. या कंपनीत हरिश शहा, मित शहा यांच्यासह निमिष मेहता आणि सेजल मेहता हे संचालक पदावर काम करतात. सप्टेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत त्यांनी त्यांच्यासह कृपा इन्कार्पोरेशन कंपनीचे एका खाजगी बँकेचे बोगस गॅरंटी बनवून, ते दस्तावेज अपूर्वकुमार गर्ग यांच्या कंपनीत सादर केले होते. या बोगस गॅरंटीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कंपनीची ८ कोटी ८१ लाख ६७ हजार ०६६ रुपयांची आर्थिक फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार नंतर कंपनीच्या वरिष्ठ संचालकाच्या लक्षात आला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित चारही संचालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कंपनीने या चारही संचालकासह त्यांना बोगस गॅरंटी बनवून देण्यास मदत करणार्‍या बँकेच्या उपव्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अपूर्वकुमार गर्ग यांनी कंपनीच्या वतीने एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मित शहा, हरिश शहा, सेजल मेहता, निमिश मेहता आणि जयेश आगरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच संबंधितांची पोलिसांकडून चौंकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page