शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करुन अनेकांची फसवणुक
मध्यप्रदेशातील कॉल सेंटरमध्ये छापा टाकून तिघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – मध्यप्रदेशातील इंदोर आणि उज्जेन शहरात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करा, चांगला परवाता मिळेल असे सांगून फसवणुक करणार्य एका टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका वयोवृद्धासह तिघांना पोलिसांनी अटक केली. राजबहादूरसिंग रामसिंग भदोरिया, अंकित ऊर्फ राजकुमार श्रीराम शिंदे आणि संजय भगवानदास बैरागी अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसंनी चार डेबीट, क्रेडिट कार्ड, चार विविध बँकेचे चेकबुक, एकोणीस मोबाईल, वीस सिमकार्ड, एक लॅपटॉप, एक राऊटर आणि तीन लाखापेक्षा अधिक लोकांचा मोबाईल क्रमांकाचा डाटा जप्त केल्याचे एपीआय दिगंबर पगार यांनी सांगितले.
५६ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत माटुंगा परिसरात राहतात. फेब्रुवारी २०२४ ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या मोबाईवर शेअर मार्केटसंदर्भातील एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्यांना प्रॉफिट बुल आणि एल. बी इंटरप्रायझेस बंगलोर या कंपन्याची माहिती देऊन एक बोगस लिंक पाठविण्यात आली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास हमखास चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कंपनीची बोगस ऍप डाऊनलोड करुन शेअरमध्ये ऑनलाईन ८ लाख ३३ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत आहे असे भासविण्यात आले होते, मात्र त्यांनी त्यांच्याच अकाऊंटमधून पैसे विड्राल करण्याचा प्रयत्न केला असता ते झाले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींकडे तक्रार केली होती. यावेळी त्यांनी त्यांना विविध टॅक्सद्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घडलेला प्रकार माटुंगा पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ भादवी सहकलम ६६ क, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनिल पारसकर, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार, पोलीस हवालदार संतोष पवार, मंगेश जर्हाड, निकम, साळुंखे यांनी तपास सुरु केला होता. आरोपीचा शोध सुरु असतानाच ६ एप्रिलला राजबहादूर भदोरीया या ६२ वर्षांच्या वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली. तो मध्यप्रदेशातील ग्लालियर, गोले का मंदिर, सैनिक कॉलनीतील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार डेबीट, के्रेडिट कार्ड, चार विविध बँकेचे चेकबुक, तीन मोबाईल आणि पाच सिमकार्ड जप्त केले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उडकीस आला होता. त्याने फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. याकामी त्याला इतर काही आरोपींनी मदत केली होती. त्यामुळे या पथकाने बुधवारी १० एप्रिलला अंकित ऊर्फ राजकुमार श्रीराम शिंदे, संजय भगवानदास बैरागी या दोघांना नंतर अटक केली.
तपासात या टोळीने मध्यप्रदेशात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित कॉल सेंटरमध्ये छापा आकून सोळा मोबाईल, पंधरा सिमकार्ड, एक लॅपटॉप, राऊटर, तीन लाखापेक्षा अधिक लोकांचा मोबाईलचा डाटा, जप्त केला होता. या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केली असून त्यापैकी ३९ लोकांनी त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अटकेनंतर आरोपींना लोकल कोर्टाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या डाटासह बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु असल्याचे एपीआय दिगंबर पगार यांनी सांगितले.