कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणुक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

चार महिलांसह सातजणांना अटक; लोनच्या नावाने अनेकांना गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणुक करणार्‍या एका टोळीचा सांताक्रुज पोलिसांनी पर्दाफाश केला. पवईतील एका कॉल सेंटरमध्ये छापा टाकून पोलिसांनी सातजणांना अटक केली असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. या टोळीने लोनच्या नावाने आतापर्यंत अनेकांना घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सातही आरोपींना बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

प्रविण सोलंकी हे सांताक्रुज येथील जुहू-तारा रोड, मांगेलवाडीत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो बजाझीन हॉलिडे ट्रॅव्हेल्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ही कंपनी गरजू लोकांना लोन देते असे सांगून तुम्हाला लोनची गरज आहे का अशी विचारणा केली होती. लोनची गरज असल्याने त्याने होकार सांगितला होता. त्यानंतर त्याने त्याच्याकडे लोन प्रोसेससह इतर कामासाठी पैशांची मागणी केली होती. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याने त्याला ऑनलाईन दोन लाख साठ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र ही रक्कम देऊनही त्याला लोन मिळाले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित यांनी गभीर दखल घेत सांताक्रुज पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे, चंद्रकांत कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, पोलीस उपनिरीक्षक विजय सरदेसाई, जितेन गांवकर, सहाय्यक फौजदार पाठक, पोलीस हवालदार चाबुकस्वार, हंचनाळे, पोलीस शिपाई सुरवसे, राणे, सावकारे, गावडे, पाटील, दिवाणजी, वसावे, मुंजवटे, काकडे यांनी तपास सुरु केला होता.

आरोपींचा शोध सुरु असताना संबंधित आरोपी पवई परिसरातून अनेकांना कॉल करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानतर या पथकाने पवईतील जेव्हीएलआर रोड, पवई प्लाझामधील एका कार्यालयात छापा टाकला होता. यावेळी तिथे एक कॉल सेंटर सुरु असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. याच कॉल सेंटरमध्ये चार महिला आणि तीन पुरुष असे सातजण अनेकांची लोनच्या नावाने फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच या सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

या कारवाईत पोलिसांनी पंधरा मोबाईल, चार लॅपटॉप, ४९ पाकिट एअरटेल कंपनीचे सिमकार्ड, व्हाडाफोन कंपनीचे वापरलेले आठ सिमकार्ड, एक प्रिंटर असा चार लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोनच्या नावाने ही टोळी फसवणुक करत होती. त्यांनी आतापर्यंत लोन देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकाळून फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर बुधवारी दुपारी सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page