बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणुक
साकिनाका येथील कॉल सेंटरमध्ये छापा टाकून सहाजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रतिबंधित औषध स्वस्तात मिळवून देतो असे सांगून विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कॉल सेंटरच्या मालकासह मॅनेजर आणि इतर चार कर्मचारी अशा सहाजणांना पोलिसांनी अटक केली. असद मोहम्मद सलीम सय्यद, झैद एहसान शेख, औवेस एहसान शेख, तौफिक वसीम शेख, अदनान अहमद सय्यद आणि रेहान याया खान अशी या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा हार्डडिस्क, दोन मोबाईल, एक पेनड्राईव्ह, विश्लेषणासाठी संगणकातील डेटा, संबंधित कगदपत्रे जप्त केले आहेत. अटकेनंतर या सहाजणांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
सााकिनकाा येथील युनिट क्रमांक ६०२, ७२ कॉर्प इमारतीमध्ये एक अनधिकृत कॉल सेंटर सुरु असून या कॉल सेंटरमधून विदेशी नागरिकांची फसवणुक केली जात आहे. प्रतिबंधित औषधांच्या विक्रीची बतावणी करुन विदेशी नागरिकांना विविध बँक खात्यात पैसे पाठविण्यात प्रवृत्त जात आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक राजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, गणेश तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार चिकणे, शेख, धारगळकर, जगताप, पवन शिंदे, पोलीस शिपाई डफले यांनी ७२ कॉर्प इमारतीमध्ये सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरमध्ये छापा आकला होता. यावेळी तिथे असलेल्या सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत असद हा कॉलसेंटरचा मालक तर झैद हा मॅनेजर म्हणून काम करत होता.
गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांनी ते कॉल सेंटर सुरु केले होते. या कॉल सेंटरमध्ये व्हीओआयपी प्रणालीचा वापर करुन विदेशी नागरिकांशी संपर्क साधला जात होता. त्यांना स्वस्तात प्रतिबंधित औषध विना डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांना दिलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. पैसे घेतल्यानंतर कुठलेही औषध न देता या विदेशी नागरिकांची फसवणुक केली जात होती. या कॉल सेंटरमधून पोलिसांनी सहा हार्डडिस्ट, दोन मोबाईल, एक पेनड्राईव्हसह इतर दस्तावेज जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध साकिनाका पोलीस भारतीय न्याय सहिता, आयटी आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.