बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणुकीचा पर्दाफाश
फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे चांगला परताव्याच्या आमिषाने गंडा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मार्च 2025
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा चुन्नाभट्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या गुन्ह्यांतील सोहल रफिक सोळंखी या 29 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून तो इतर मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे चांगला परतावा देतो असे सांगून ही टोळी अनेकांना गंडा घात होती. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक झाली होती. याबाबतच्या काही तक्रारी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. या तक्रारीबाबत शहानिशा केल्यानंतर संबंधित ठग अनेकांना संपर्क साधून शेअरमार्केट ट्रेडिंगपेक्षा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा असल्याचे सांगत होते. त्यांना विशिष्ठ फॉरेक्स ट्रेडिंगचा अॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करुन त्यांचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यानंतर त्यांची माहिती अपलोड करुन लॉगिंग आयडी आणि पासवर्ड दिला होता. त्यांना त्यांच्या बँक खात्यातून ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त करुन पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगत होते. त्यांनी गुंतवणुक केलेल्या ट्रेडिंगमध्ये त्यांना चांगला फायदा होत असल्याचे त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या परिचित लोकांनाही या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुतवणुक करण्यास प्रवृत्त करत होते. मात्र मूळ रक्कमेसह कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केली जात होती.
तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच चुन्नाभट्टी येथील जोगानी इंडस्ट्रिज, इमारत क्रमांक आठ, गाळा क्रमांक 409 मध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरु असून या कॉल सेंटरमधून फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवुणक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त युसूफ सौदागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, पाटील, पोलीस उपनिरीक्षक डमरे, गोल्हार, टेंभे, पोलीस हवालदार राणे, बनकर, महिला पोलीस हवालदार टक्केकर, पोलीस शिपाई पठाणे, वडते यांनी गाळा क्रमांक 409 मध्ये छापा टाकला होता.
या छाप्यात पोलिसांनी सोहेल सोळंखीसह युसूफ युनूस खान, अरबाज शाहिद शेख, गौसिया इस्थेखात शेख आणि गौरी प्रमोद कांबळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते सर्वजण विविध फॉरेक्स ट्रेडिंग अॅपवर गुंतवणुक करुन ग्राहकांना खोट्या नावाने कॉलिंग करताना दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी सहा संगणक सेट, सहा लॅपटॉप, 27 मोबाईल हँडसेट, 23 विविध कंपन्याचे सिमकार्ड, ग्राहकांना कॉलिंग करताना मार्गदर्शन करुन फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी सूचना लिहिलेल्या वह्या जप्त केलया आहेत.
तपासात सोहेल सोळंखी हा या कटातील काही मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्यासह इतर आरोपीविरुद्घ पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर सोहेलला पोलिसांनी अटक केली. सोहेल हा नवी मुंबईतील नेरुळ, सेक्टर वीस, शिवमंगल अपार्टमेंटमध्ये राहतो. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणुक केली आहे. त्यामुळे फसवणुक झालेल्या ग्राहकांनी चुन्नाभट्टी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.