मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑगस्ट 2025
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणार्या एका टोळीचा गोरेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. सुनिल लक्ष्मण गर आणि आशिषकुमार लालमनराम जैस्वार अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत कॉल सेंटरचा मालक रोहित कदम, कर्मचारी अनिल गर यांच्यासह इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने गेल्या दोन वर्षांत दोनशेहून अधिक भारतीयांची फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी भारतीयांसह विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्या अनेक कॉल सेंटरवर कारवाई केली होती. तरीही काही कॉल सेंटरमध्ये नागरिकांचे फसवणुकीचे प्रकार सुरु होते. त्यामुळे अशा कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. ही कारवाई सुरु असताना गोरेगाव येथील राम मंदिर रोड, आस्मी कॉम्प्लेक्स आर पाचमध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरु असून या कॉल सेंटरमधून अनेक भारतीय नागरिकांची फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, सत्यजीत पाटील, महादेव निंबाळकर, पोलीस शिपाई रेवाळे, गर्जे, दिपक पाटील व अन्य पोलीस पथकाने तिथे कारवाई केली होती. यावेळी तिथे असलेल्या सुनिल गर आणि आशिषकुमार जैस्वार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे आयटी मंत्रालयाचे परवाने, टेलिकम्युनिकेशन परवाना, गुमास्ता लायसन्स, कंपनीचे रजिस्ट्रेशन कागदपत्रे, ग्राहकांसह वेंडरची यादी, आऊटसोर्सिंग लायसन्स, नेटवर्क अग्रीमेंट आणि भाडेकरारनामा आदींची मागणी केली असता त्यांच्याकडे भाडेकरार वगळता कुठलेही दस्तावेज नव्हते.
तपासात तो गाळा धर्मेश रामजी परमार याच्या मालकीचा होता तर कॉल सेंटरचा मालक रोहित कदम हा होता. कारवाईदरम्यान तिथे काही कर्मचारी व्हॉटसअप आणि एनी डेस्क अॅपद्वारे नागरिकांना बोगस फॉरेक्स ट्रेडिंगची माहिती देऊन त्याची फसवणुक करत असल्याचे दिसून आले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी एक बोगस वेबपोर्टल सुरु केले होते. त्यानंतर त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या पैशांवर डल्ला मारला जात होता.
घटनास्थळाहून पोलिसांनी मोबाईल, संगणक, मोबाईल, हार्डडिस्क, स्क्रिप्ट, तीन बोगस आधारकार्ड, खाजगी बँकेचे डेबीट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केले आहे. तपासात गेल्या दोन वर्षांपासून ते कॉल सेंटर सुरु होते. संगणक आणि हार्डडिस्कमध्ये दोनशेहून अधिक पिडीतांची माहिती पोलिसांनपा प्राप्त झाली आहे. या सर्वांना फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या पैशांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
याच गुन्हयांत नंतर सुनिल गर आणि आशिषकुमार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. कॉल सेंटरचा मालकासह इतर आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.