बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणुक

गोरेगाव येथे गुन्हे शाखेच्या कारवाईत तेराजणांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई करुन तेराजणांना अटक केली आहे. त्यात दोन कॉल सेंटरचे मालक-चालक, एक मॅनेजर आणि दहा टेलिकॉलरचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, आयटी आणि टेलिकॅम्युनिकेशन कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर सर्व आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी पंधरा संगणक, दहा लॅपटॉप, वीस मोबाईलसह इतर साहित्य हस्तगत केला आहे.

गोरेगाव परिसरात काही बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणुक होत असल्याची माहिती दहिसर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या कॉल सेंटरमधून आतापर्यंत अनेक अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्यात आल्याने त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांनी गंभीर दखल घेत दहिसर युनिटला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने अशा बोगस कॉल सेंटरची माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता.

ही माहिती काढत असताना गोरेगाव येथील जवाहर फाटकाजवळील वॉलभट्ट रोड, विहान कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये संबंधित बोगस कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्यासह पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, पोलीस उपनिरीक्षक अजय सावंत, सहाय्यक फौजदार अल्ताफ खान, सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, कैलास सावंत, पोलीस हवालदार संतोष राणे, संतोष बने, समुद्धी गोसावी, विशाल गोमे, विशाल पवार, अर्पिता पडवळ, प्रसाद गोरुले, पोलीस शिपाई अरुण धोत्रे, विपुल ढाके यांनी विहान कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या गाला क्रमांक 704 आणि 705 मध्ये एकाच वेळेस छापा टाकला होता.

यावेळी तिथे बोगस कॉल सेंटर सुरु असल्याचे दिसून आले. या कॉल सेंटरमधील टेलिकॉलर अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांच्या संगणकामध्ये ग्रीकस्कॉक्ड आणि मेक कॅफे हे अ‍ॅण्टीवायरस रिन्यूव्ह करण्याबाबत मेल पाठवत होते. त्यांना टोल फ्री म्हणून नंबर पाठवून त्यांनाा आयबेम नावाचे सॉफ्टवेअरवरुन कॉल करुन अ‍ॅण्टी वायरस रिन्यूव्ह करण्यासाठी 250 ते 500 डॉलर्सचे गिफ्टकार्ड खरेदी करण्यास प्रवृत्त करत होते. त्यानंतर गिफ्टकार्डद्वारे क्रिप्टो करन्सीमध्ये डॉलर कन्वर्ट करुन अमेरिकन नागरिकांची फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले.

हा प्रकार उघडकीस येताच तिथे उपस्थित दोन कॉल सेंटरच्या चालक-मालक, एक मॅनेजर आणि दहा टेलिकॉलर अशा तेराजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. घटनास्थळाहून पोलिसांनी पंधरा संगणक, दहा लॅपटॉप, वीस मोबाईलसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपीविरुद्ध नंतर भारतीय न्याय सहिता, आयटी आणि टेलिकॅम्युनिकेशन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या सर्वांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा कॉल सेंटर सुरु होता. त्यांनी आतापर्यंत किती अमेरिकन नागरिकांची किती रुपयांची फसवणुक केली, अशाच प्रकारे इतर कुठे त्याचे कॉल सेंटर सुरु आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page