मुंबई शहरात लॉरेन्स बिष्णोईच्या गुंडाकडून घातपाताचा निनावी कॉल
दादर रेल्वे स्थानकासह आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारामागे गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सहभाग उघडकीस आल्यानंतर आता मुंबई शहरात पुन्हा बिष्णोईकडून मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्यात येणार असल्याच्या निनावी कॉलमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दादर रेल्वे स्थानकात होणार्या संभाव्य घातपाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकासह आसपासच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, मात्र चौकशीदरम्यान हा बोगस कॉल असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी बोगस कॉल करुन शहरात तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा दोन वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने एक लाल टी शर्ट घातलेला तरुण दादर रेल्वे स्थानकात घातपात घडविणार आहे. तो तरुण गॅगस्ट लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगून कॉल बंद केला होता. या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी वारंवार कॉल केला, मात्र तो कॉल बंद असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कंट्रोल रुमने दादर, शिवाजीपार्क, दादर रेल्वे आणि भोईवाडा पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकासह आसपासच्या परिसरातील बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली आहे. तपासात हा बोगस कॉल असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. आरोपी कॉलरच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. १४ एप्रिलला सलमानच्या घराजवळ दोन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांनाही गुजरातच्या भूज येथून अटक केली. त्यानंतर लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने एक कॅब बुक करुन ती कॅब सलमान खाच्या घरी पाठविण्यात आली होती. याप्रकरणी रोहित त्यागी या उत्तरप्रदेशच्या बीबीएच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने कॅब बुक केली होती. सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबाराच्या बातमीला मुंबईसह देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. या प्रसिद्धीचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने हा कॉल केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.