सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन लुटमार

गुन्हा दाखल होताच दोन्ही तोतया अधिकार्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जुलै 2025
मुंबई, – सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन एका गॅस एजन्सीच्या दोन कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन त्यांच्याकडील 71 हजाराची कॅश पळविणार्‍या दोन तोतया अधिकार्‍यांना मालवणी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. प्रविणकुमार सतीश सिंग आणि अभिषेक छोटेलाल विश्वकर्मा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही धारावी आणि गोरेगाव येथील रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यातील तक्रारदार कन्हैयालाल शर्मा हे एका गॅस एजन्सीमध्ये कामाला आहे. शनिवारी ते त्यांचे सहकारी मोहीदूलअलीसोबत मालाडच्या मार्वे रोड, खारोडीजवळ गॅस एजन्सीचे सिलेंडर डिलीव्हरीसाठी पिकअप टेम्पोतून जात होते. यावेळी तिथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा टेम्पो अडवून तो सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना मार्वे बीच येथे घेऊन गेले होते. तिथे त्याचा अन्य एक सहकारी आला. या दोघांनी कन्हैयालाल आणि मोहीदूलअली यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील 71 हजाराची कॅश घेतले. त्यानंतर या दोघांनाही मालाडच्या लिंक रोड, काचपाडा परिसरात सोडून ते दोघेही पळून गेले होते. या घटनेने ते दोघेही प्रचंड घाबरले होते.

घडलेल्या प्रकार मालकाला सांगितल्यानंतर मालकाने त्यांना मालवणी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना दोन्ही तोतया सीबीआय अधिकार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत मालवणी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश शिळमकर यांना सोपविण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.

या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश शिळमकर, पोलीस हवालदार विक्रांत मेहेर, गणेश सावंत, पोलीस शिपाई गणेश आमटे, राकेश शिंदे, अभिजीत पाटील, विनय भंडारी यांनी वेगवेगळ्या परिसरातून प्रविणकुमार सिंग आणि अभिषेक विश्वकर्मा या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या दोघांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन या दोघांनी रॉबरीच्या उद्देशाने या दोघांनाही शिवीगाळ व मारहाण करुन त्यांच्याकडील 71 हजाराची कॅश घेऊन पलायन केले होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांच्याविरुद्ध इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश शिळमकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page