बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रासह गुणपत्रिकेची विक्री करणारा गजाआड
विदेशात नोकरीसाठी जाणार्या इच्छुकांना प्रमाणपत्र विक्री केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – पन्नास ते दोन लाखांमध्ये विविध राज्यातील नामांकित कॉलेज, विद्यापिठाच्या बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रासह गुणपत्रिकेची विक्री करणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करुन इमिग्रेशन अधिकार्यांनी या कटातील मुख्य आरोपीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. प्रथमेश शिरीशभाई मणियार असे या 39 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा गुजरात जामनगरचा रहिवाशी आहे. त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विविध राज्यातील नामांकित कॉलेजसह विद्यापिठाच्या प्रमाणपत्रासह गुणपत्रिका जप्त केल्या आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहताशकुमार लक्ष्मीनारायण हे मूळचे दिल्लीचे रहिवाशी असून सध्या अॅण्टॉप हिल परिसरात राहतात. सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी त्यांची रात्रपाळी होती, त्यामुळे ते रात्री आठ वाजता कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना काऊंटर क्रमांक 23 वर कर्तव्य देण्यात आले होते. रात्री उशिरा अडीच वाजता बँकाँकहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रथमेश मणियार हा प्रवाशी आला होता. त्याच्याकडील पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि इतर कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्याला त्याचे नाव आणि विदेशात जाण्याबाबत कारण विचारण्यात आले होते, मात्र त्याने त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
तपासात प्रथमेश हा गुजरातच्या जामनगरचा रहिवाशी असून विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. शाळा सोडलेल्या तसेच कॅनडा आणि युके देशात नोकरीसाठी जाणार्या इच्छुक उमेदवारांना तो वेगवेगळ्या उच्च माध्यमिक विद्यालय, कॉलेज, विद्यापिठाचे बोगस प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र देण्याचे काम करत होता. बोगस प्रमाणपत्र देणारा तो एजंट असून त्याच्याकडे इतर काही एजंट कामाला आहेत. प्रत्येक प्रमाणपत्रामागे तो इच्छुक उमेदवाराकडून पन्नास हजार ते दोन लाख रुपये घेत होता. ही रक्कम त्याच्या चार वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जात होती. त्याच्याकडून या अधिकार्यांनी एक मोबाईल जप्त केला असता त्यात मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील विविध नामांकित कॉलेजसह विद्यापिठाची डिजीटल बोगस प्रमाणपत्र दिसून आले.
त्याच्या चौकशीतून त्याने आतापर्यंत अनेकांना बोगस प्रमाणपत्रासह गुणपत्रिकांची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात त्यांच्या नावाच्या काही प्रमाणपत्रासह गुणपत्रिकाचा समावेश होता. गेल्या दहा वर्षांपासून तो या टोळीचा मुख्य सूत्रधार म्हणून कार्यरत असून त्याच्याकडे देशभरात अनेक एजंट कामाला आहे. त्याच्यामार्फत तो विदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बोगस प्रमाणपत्रासह गुणपत्रिकांची विक्री करत होता. अशा प्रकारे या टोळीने विविध कॉलेजसह विद्यापिठासह शासनाची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
याप्रकरणी रोहताशकुमार लक्ष्मीनारायण यांच्या तक्रारीवरुन प्रथमेश मणियार याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनविणे, त्याची विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात त्याच्या इतर काही एजंटाची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.