पंधरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणासह विनयभंगाची तक्रार बोगस

अभ्यासावरुन खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचाराच्या उद्देशाने घरातून शाळेत जाताना भरस्त्यात रिक्षातून तीनजणांच्या टोळीने अपहरण करुन एका फ्लॅटमध्ये आणून विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप करुन भांडुप पोलिसांना कामावर लावणार्‍या त्या पंधरा वर्षांच्या मुलीची तक्रारच बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन असा कुठलाही प्रकार घडलाच नाही. त्यानंतर या मुलीच्या चौकशीतून तिने अभ्यासावरुन आईशी झालेल्या वादानंतर खोटी माहिती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. मात्र तिच्या बोगस तक्रारीमुळे भांडुप पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

पंधरा वर्षांची ही मुलगी भांडुप येथे राहते. २७ सप्टेंबरला ती सकाळी पावणेसात वाजता शाळेत जात होती. यावेळी वाटेतच तिचे तीन तरुणांनी अपहरण केले. तिला एका रिक्षात बसवून एका फ्लॅटमध्ये आणण्यात आले होते. तिथेच त्यांनी तिच्याशी अश्‍लील चाळे करुन विनयभंग केला होता. तिला मासिक पाळी असल्याचे समजताच ते तिघेही तिला पुन्हा रिक्षातून भांडुप रेल्वे स्थानकात आले होते. तिथे तिला सोडल्यानंतर ते तिघेही पळून गेले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने घरी आल्यानंतर तिच्या आईला हा प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून तिला प्रचंड धक्का बसला होता. त्यानंतर मुलीच्या आईने भांडुप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र फुटेजमध्ये अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या मुलीची पोलिसांनी चौकशी केली असता तिने तिच्या आईला खोटी माहिती देऊन पोलिसांत तक्रार केली होती. अभ्यास करण्यावरुन तिचे तिच्या आईशी वाद झाला होता. त्यामुळे तिने ही बोगस तक्रार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलीला पोलिसांकडून योग्य ती समज देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page