क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याची बतावणी करुन लुटमार
मुख्य आरोपींसह पाचजणांना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याची बतावणी करुन एका वकिलाकडील सुमारे पाच लाख रुपयांची कॅश घेऊन पळून गेलेल्या दोन मुख्य आरोपीसह पाचजणांना खार पोलिसांनी अटक केली. संदेश दत्ताराम मालाडकर, प्रफुल्ल शंकर मोरे, विकास श्रीधर सुर्वे, चेतन केम्पे गौडा आणि दर्शन महेश यागनिक अशी या पाचजणांची नावे आहेत. या कारवाईत पाचही आरोपींकडून तीन लाख तीस हजार रुपयांची कॅश, गुन्ह्यांतील बाईक हस्तगत करण्यात आली आहे. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील संदेश आणि प्रफुल्ल हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अशाच इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी व्यक्त केली आहे.
यातील तक्रारदार व्यवसायाने वकिल आहेत. ८ सप्टेंबरला ते त्यांच्या चुलत भावाची कामाची कॅश बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी खार येथील सोळावा रोड, बॉम्बे सॅलेडशेजारील कॅनडा बँकेजवळ आले होते. यावेळी त्यांनी सत्तर हजार रुपये डिपॉझिट केली तर उर्वरित रक्कम घेऊन ते एटीएमच्या बाहेर आले होते. याच दरम्यान तिथे दोनजण आले आणि त्यांनी क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्याचा बहाणा करुन त्यांनी त्यांच्याकडील पाच लाखांची कॅश घेऊन घेऊन सांताक्रुज येथे सोडल्यांनतर या दोघांनी पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या तक्रार अर्जावरुन खार पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध २०४, ३१८ (४), ३१९ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना तपास करुन आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक वैभव काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताराम कोकणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गवळी, पोलीस अंमलदार मनोज वैद्य, पोलीस हवालदार भरत काच्चे, दिनेश शिर्के, आनंद निकम, पोलीस शिपाई विशाल जाधव, अजीत जाधव, मारुती गळवे, मयुर जाधव, केदारनाथ शिंदे, गणेश हंचनाळे यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सिंधुदुर्गच्या आचरा येथून संदेश मालाकर याला गुन्ह्यांतील बाईकसह शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीनंतर इतर चारही आरोपींना अंधेरीतील एका हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
तपासात संदेश आणि प्रफुल्ल हे पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. संदेशविरुद्ध भोईवाडा, रबाळे, मनपाडा, सीबीडी बेलापूर, खांदेश्वर, मालाड, दहिसर, नवघर पोलीस ठाण्यात आठ तर प्रफुल्लविरुद्ध मीरा रोड, दहिसर पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लाख तीस हजार रुपयांची कॅश आणि बाईक जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.