बोगस नोटा छपाई करणार्‍या प्रिटींग प्रेसच्या मालकाला अटक

आरोपींच्या अटकेने मशीन फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मानखुर्द येथे बोगस नोटांच्या विक्रीप्रकरणात अन्य एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी रत्नागिरी येथून अटक केली. प्रसाद राणे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याच प्रिटींग प्रेसमध्ये बोगस नोटांची छपाई झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींच्या अटकेनंतर त्याने ही मशिन फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही मशिन गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी जप्त केली आहे. प्रसादच्या अटकेने या गुन्ह्यांतील आरोपींची संख्या आता सात झाली असून त्यात एका वकिलासह पंतसंस्थेच्या मॅनेजर व बोगस नोटा विक्री करणार्‍या चार आरोपींचा समावेश आहे. अटकेनंतर प्रसादला किल्ला कोर्टाने सोमवार ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जुलै महिन्यांच्या तिसर्‍या आठवड्यात मानखुर्द टी जंक्शन परिसरात काहीजण बोगस नोटांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून शहानवाज आयुब शिराळकर, राजेंद्र आत्माराम खेतले, संदीप मनोहर निवाळकर आणि ऋषिकेश रघुनाथ निवाळकर या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या सात लाख दहा हजार रुपयांचे चार हजार दोनशे बोगस नोटा, चार मोबाईल आणि एक कार जप्त केली होती. यातील शहानवाज आणि राजेंद्र चिपळूण तर संदीप आणि ऋषिकेश हे खेडचे रहिवाशी आहेत. शहानवाजचा स्वतचा सर्व्हिस सेंटर आहे तर राजेंद्र हा चालक, संदीप व ऋषिकेश कारपेंटर आहेत. रत्नागिरी येथू ते चौघेही बोगस नोटांची विक्रीसाठी मानखुर्द परिसरात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अमीत नारायण कासार याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने चिपळूण येथून अमीतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेचा ब्रॅच मॅनेजर आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख एकतीस हजार रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर याच गुन्ह्यांत एका वकिलाला पोलिसांनी अटक केली होती.

ही कारवाई सुरु असताना दोन दिवसांपूर्वी प्रसाद राणे याला रत्नागिरी येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचे एक प्रिटींग प्रेस असून याच प्रेसमध्ये बोगस नोटांची छपाई झाली होती. मात्र या गुन्ह्यांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या काही सहकार्‍यांना अटक केल्याची माहिती मिळताच त्याने बोगस नोटा छपाई केलेले मशीन फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मशिन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याच्या मदतीने पंतसंस्थेचा मॅनेजर अमीत कासार हा बोगस नोटाचे वितरण करत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page