मानखुर्द येथे बोगस नोटांच्या विक्रीप्रकरणी चौकडीला अटक

शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या ७.१० लाखांचा नोटा जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जुलै २०२४
मुंबई, – मानखुर्द येथे बोगस नोटांच्या विक्रीप्रकरणी एका चौकडीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शहानवाज आयुब शिराळकर, राजेंद्र आत्माराम खेतले, संदीप मनोहर निवाळकर आणि ऋषिकेश रघुनाथ निवाळकर अशी या चौघांची नावे असून ते चौघेही रत्नागिरीच्या चिपळून आणि खेडचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या सात लाख दहा हजार रुपयांच्या बोगस नोटासह एक कार आणि चार मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर चारही आरोपींना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

मानखुर्द टी जंक्शन परिसरात काहीजण बोगस नोटांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, तोडकर, पोलीस हवालदार खरात, जगताप, पोलीस शिपाई डफळे, चव्हाण यांनी शुक्रवारी तिथे साध्या वेशात पाळत होती. दुपारी पावणेतीन वाजता तिथे आलेल्या एका कारमधून चारजण उतरले. या चौघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना सात लाख दहा हजार रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. त्यात शंभर रुपयांच्या सोळाशे, दोन रुपयांचे चौवीशे आणि पाचशे रुपयांच्या चारशे तीस बोगस नोटांचा समावेश होता. या नोटासह गुन्ह्यांतील कार आणि त्यांच्याकडील चारही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले.

यातील शहानवाज शिरलकर, राजेंद्र खेतले चिपळून तर संदीप निवाळकर आणि ऋषिकेश निवाळकर हे खेडचे रहिवाशी आहे. शहानवाजचा स्वतचा सर्व्हिस सेंटर आहे तर राजेंद्र हा चालक, संदीप व ऋषिकेश कारपेंटर आहेत. रत्नागिरी येथू ते चौघेही बोगस नोटांची विक्रीसाठी मानखुर्द परिसरात आले होते. बोगस नोटा बाळगल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात अटक केल्यांनतर त्यांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना बोगस नोटा कोणी दिल्या, त्या कोणाला विक्रीसाठी मुंबईत आले होते, या बोगस नोटांची छपाई त्यांनी कुठे केली, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांनी यापूर्वीही बोगस नोटांची विक्री केली आहे किंवा भारतीय चलनात बोगस चलन चालविण्याचा प्रयत्न केला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page