बोगस नोटा तस्करीप्रकरणी पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक
चिपळूणमध्ये गुन्हे शाखेची कारवाई; इतर आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जुलै २०२४
मुंबई, – मानखुर्द येथे बोगस नोटांच्या विक्रीप्रकरणात अन्य एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी चिपळूण येथून अटक केली. अमीत नारायण कासार असे या आरोपीचे नाव असून चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेचा ब्रॅच मॅनेजर असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी शहानवाज आयुब शिराळकर, राजेंद्र आत्माराम खेतले, संदीप मनोहर निवाळकर आणि ऋषिकेश रघुनाथ निवाळकर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या सात लाख दहा हजार रुपयांच्या चार हजार दोनशे बोगस नोटासह एक कार आणि चार मोबाईल जप्त केले होते.
गेल्या आठवड्यात मानखुर्द टी जंक्शन परिसरात काहीजण बोगस नोटांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, तोडकर, पोलीस हवालदार खरात, जगताप, पोलीस शिपाई डफळे, चव्हाण यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून शहानवाज, राजेंद्र, संदीप आणि ऋषिकेश या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या चौघांकडून पोलिसांनी सात लाख दहा हजार रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या होत्या. यातील शहानवाज आणि राजेंद्र चिपळूण तर संदीप आणि ऋषिकेश हे खेडचे रहिवाशी आहेत. शहानवाजचा स्वतचा सर्व्हिस सेंटर आहे तर राजेंद्र हा चालक, संदीप व ऋषिकेश कारपेंटर आहेत. रत्नागिरी येथू ते चौघेही बोगस नोटांची विक्रीसाठी मानखुर्द परिसरात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्या चौकशीत अमीत कासार याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने चिपळूण येथून अमीतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेचा ब्रॅच मॅनेजर आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख एकतीस हजार रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला मंगळवारी २३ जुलैला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पाचही आरोपीविरुद्ध बोगस नोटा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस नोटांची विक्री करणारी एक टोळीच असून या टोळीच्या इतर काही आरेापींची नावे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.