मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 सप्टेंबर 2025
मुंबई, – बोगस डॉक्टरच्या औषधोपचारामुळे नानटून झा नावाच्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रमेशचंद्र बन्सीलाल विश्वकर्मा या बोगस डॉक्टरविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी हलगर्जीपणाने औषधोपचार करुन रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रमेशचंद्रकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना त्याने ओम क्लिनिक नावाचे दवाखाना थाटून तिथे रुग्णावर उपचार सुरु केले होते. नानटून झा यांच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ महिन्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत चौकशी करुन रमेशचंद्र विश्वकर्माला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. चुकीच्या औषधोपचारामुळे एका रुग्णाचा नाहक जीव गेल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
शर्मिलादेवी नानटून झा ही महिला तिचे पती नानटून आणि तीन मुलांसोबत चेंबूरच्या व्ही. एन पुरव मार्ग, सुमननगर परिसरात राहते. तिचे पती रिक्षाचालक असून ती स्वतला कुर्ला येथे नोकरीस आहे. 7 डिसेंबर 2024 रोजी तिच्या पतीची डावी दाढ किडलेली आणि दुखत असल्याने त्यांना प्रचंड वेदना होत होते. त्यामुळे ती तिच्या पतीची दाढ काढण्यासाठी लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट येथे गेली होती. तिथे डॉक्टरांनी उपचार करुन त्यांची दाढ काढून टाकली होती. दुसर्या दिवशी नानटून हे कामावर निघून गेले. मात्र दुपारी तब्येत बिघडल्याने तसेच दाढ काढल्याने त्यांच्या गालावर सुज आली होती. त्यामुळे ते परिसरातील ओम क्लिनिकमध्ये गेले होते. तिथे डॉ. रमेशचंद्र विश्वकर्मा याने त्यांना तपासून वेदना कमी होण्यासाठी इंजेक्शन दिले होते. त्यांच्याकडून औषध घेतल्यानंतर ते दोघेही घरी आले होते.
जेवणानंतर नानटूनने डॉक्टरने दिलेले औषध घेतले होते. मात्र औषध घेतल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडल्याने शर्मिलादेवीने त्यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना तपासून डॉक्टांनी मृत घोषित केले होते. रमेशचंद्र विश्वकर्मा यांच्या औषधोपचारामुळे तिच्या पतीची प्रकृती बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिने क्लिनिकमध्ये जाऊन त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन तेथून पिटाळून लावले.
या घटनेनंतर शर्मिलादेवीने महानगरपालिकेतील आरोग्य विभागात रमेशचंद्र विश्वकर्मा याच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला रमेशचंद्रकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसून रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, अर्हता नसल्याचे समजले. तो कुठल्याही रुग्णावर उपचार करु शकत नाही. तसेच त्यांना इंजेक्शन किंवा औषध देऊ शकत नाही. तो बोगस डॉक्टर असल्याची माहिती तिला कुर्ला येथील मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली होती.
हा प्रकार उघडकीस येताच तिने रमेशचंद्र विश्वकर्मा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना, रुग्णावर उपचार करण्याचे कुठलेही ज्ञान नसताना, त्यांच्यावर उपचार करुन औषध देणे, या औषधोपचारामुळे रुग्णाचा झालेल्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. त्याचे ओम क्लिनिक पोलिसांनी सील केल्याचे बोलले जाते.