ऑनलाईन पोर्टलद्वारे बोगस दस्तावेज बनविणार्या सेंटरचा पर्दाफाश
मालवणी पोलिसांची कारवाई; मुख्य आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – ऑनलाईन पोर्टलद्वारे बोगस शासकीय दस्तावेज बनविणार्या एका सेंटरचा मालवणी पोलिसांची पर्दाफाश करुन एका मुख्य आरोपीस अटक केली. मोहसीन मोहम्मद रफि शेख असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून शासनाची फसवणुक केल्यााप्रकरणी कारवाई केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक संगणक, किबोर्ड, माऊस, प्रिंटर, राऊटर आणि मोठ्या प्रमाणात बोगस शासकीय दस्तावेज जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाडच्या मालवणी, गायकवाड नगर परिसरात एम. एस कन्सलटंट नावाचे एक सेंटर आहे. या सेंटरमध्ये बोगस मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर शासकीय दस्तावेज बनविले जात असून गरजू लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्यासह शासनाची फसवणुक होत असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. बुधवारी ३ एप्रिलला या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे, पोलीस हवालदार अनिल पाटील, बुगडे, पोलीस शिपाई अरुण राठोड, विलास आव्हाड, नवनाथ शिंदे, सचिन वळतकर यांनी छापा टाकला होता. यावेळी तिथे मोहसीन शेख हा गरजू लोकांना ऑनलाईन पोर्टलवरुन बोगस दस्तावेज बनवून देत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडील संगणकाची पाहणी केल्यानंतर त्याने ऑनलाईन पोर्टलवरुन बोगस मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आयुषमान भारत कार्डसाठी अनेकांचे अर्ज भरल्याचे दिसून आले होते. त्यासाठी संबंधित व्यक्तींची खोटी माहिती अपलोड करुन त्यावर येणारा बारकोड स्कॅन करुन पैसे भरल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे अर्ज केलयानंतर संबंधित व्यक्तींना तात्काळ त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्डसह इतर शासकीय दस्तावेज उपलब्ध मिळत होते. ठराविक रक्कम घेऊन मोहसीनने संबंधित व्यक्तींसह शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केली.
अटकेनंतर गुरुवारी दुपारी मोहसीनला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मोहसीन हा कधीपासून लोकांना बोगस दस्तावेज बनवून देत होता. त्याने आतापर्यंत किती लोकांना बोगस दस्तावेज बनवून दिले होते. त्यांच्याकडून किती रुपये घेतले आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणीही सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.