बोगस एम्पॉलमेंट एक्सचेंजचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
शंभरहून बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका बोगस एम्पॉलमेंट एक्सचेंज एक्सचेंजचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. या टोळीने सोशल मिडीयावर युरोप देशात मोठ्या प्रमाणात नोकरी भरती सुरु असल्याची बतावणी करुन शंभरहून अधिक बेरोजगार तरुणांची सुमारे दोन ते अडीच कोटीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत क्रिष्णा कमलाकांत त्रिपाठी या ५२ वर्षांच्या बिझनेस डेव्हल्पमेंट मॅनेजरला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने मंगळवार ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह इतर तीन ते चार आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी सांगितले.
अंधेरी परिसरात बोगस एम्पॉलमेंट एक्सचेंज उघडून काहीजण बेरोजगार तरुणांना विदेशात नोकरीच्या आमिषाने गंडा घालत आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठांकडून गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांनतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, संग्राम पाटील, राहुल प्रभू, पोलीस उपनिरीक्षक अरविंद मोरे, विकास मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, पोलीस हवालदार यादव, कांबळे, रहेरे, पोलीस शिपाई सटाले, बिडवे, महिला पोलीस शिपाई भिताडे यांनी या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी अंधेरीतील पश्चिम दुतग्रती मेट्रो स्टेशनजवळील द सुमीत बिझनेसच्या नवव्या मजल्यावर एक्झीम इमिग्रेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक कार्यालय असून याच कार्यालयातून नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे अचानक छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या क्रिष्णा त्रिपाठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तो कंपनीत बिझनेस डेव्हल्पमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत होता.
कंपनीचे मालकासह इतर संचालकांनी दोन वर्षांपूर्वी या कंपनीची स्थापना करुन तिथे एक कार्यालय सुरु केले आहे. तिथे बोगस एम्पॉलमेंट एक्सचेंज उघडून त्याची सोशल मिडीयावर जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये युरोप देशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखविण्यात येत होते. गेल्या दोन वर्षांत या टोळीने शंभरहून अधिक बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाने गंडा घातला होता. प्रत्येक तरुणांकडून त्यांनी दोन ते तीन लाख रुपये नोकरीसाठी घेतले होते. मात्र कोणालाही नोकरी दिली नाही. पैशांची मागणी केल्यांनतर त्यांना काही रक्कम देऊन ही टोळी उर्वरित पैशांचा अपहार करत होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच संबंधित टोळविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (२), (३), ३४० (२), ६१ (२) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी व्होडाफोन कंपनीचे ४५ सिमकार्ड, जिओचे दहा सिमकार्ड, आठ लॅपटॉप एक डेस्कटॉप, दोन मोबाईल, दोन बोगस स्टॅम्प, एक लाख बावीस हजाराची कॅश, व्हिजिटिंग कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले आहेत. या गुन्ह्यांतील कंपनीचे मुख्य आरोपीसह इतर संचालक पळून गेले असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहे.