लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत मुलाच्या अटकेची धमकी देऊन खंडणीची मागणी

भारतीय नौसेनेच्या कर्मचार्‍याची फसवणुक; तोतया सीबीआय अधिकार्‍यावर गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत मुलाच्या अटकेची धमकी देऊन भारतीय नौसेनेच्या एका कर्मचार्‍याकडून ५० हजार वसुल करुन एक लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार कुलाबा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या कर्मचार्‍याच्या तक्रारीवरुन तोतया सीबीआय अधिकार्‍याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी फसवणुकीसह खंडणी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

५५ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत कांजूरमार्ग येथे राहतात. ते सध्या भारतीय नौसेनेत फोरमॅन म्हणून कामाला असून त्यांची नेमणूक कुलाबा येथील कोमोडोर ऑफ द यार्ड कार्यालयात आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. सकाळी पावणेअकरा वाजता ते कामात असताना त्यांना एका अज्ञात क्रमांकावरुन व्हॉटअप कॉल आला होता. यावेळी समोरुन बोलणार्‍या व्यक्तीने तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या लहान मुलाविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा कॉलेजला गेल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने त्यांच्या मुलाविरुद्ध लैगिंक अत्याचाराच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याला आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. गुन्हा दाखल करायचा नसेल तर त्यांनी तातडीने ५० हजार रुपये पाठवून द्या. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्यांच्याशी एका मुलाशी बोलणे करुन दिले. यावेळी तो मुलगा रडत होता. पोलिसांना त्याला बेदम मारहाण केली असे सांगत होता. त्याचा रडण्याचा जास्त आवाज असल्याने तो त्यांचाच मुलगा आहे का याबाबत त्यांना शंका आली होती. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले होते.

लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला की मुलाचे करिअर खराब होईल म्हणून त्यांनी त्याने दिलेल्या मोबाईलवर ऑनलाईन ५० हजार रुपये पाठवून दिले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्याने त्यांच्याकडे आणखीन एक लाखांची मागणी केली होती. मात्र एक लाख रुपये नसल्याने त्यांनी थोडा वेळ मागून घेतला होता. यावेळी त्याने त्यांच्याशी पुन्हा त्या मुलाशी बोलणे करुन दिले. यावेळी हा मुलगा पुन्हा रडत रडत पोलीस त्याला मारत असल्याचे सांगत होता. घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितला. यावेळी तिने त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये असून काही वेळापूर्वीच त्याचा फोन आला होता असे सांगितले. याच दरम्यान संबंधित तोतया सीबीआय अधिकार्‍याने त्यांना दहा ते बारा कॉल केले होते. मात्र त्यांनी त्याचे कॉल घेतले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. मुलावर लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल होत असून त्याला या गुन्ह्यांत अटकेची धमकी देऊन या तोतयाने त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले आणि आणखीन एक लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या तक्रार अर्जावरुन कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक आणि खंडणीची मागणी करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा कुलाबा पोलिसांकडून तपास सुरु आहे. संबंधित तोतया अधिकार्‍याच्या मोबाईलचे सीडीआर काढले असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page